सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
बारामती : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने हालचाली वेगवान केल्या असून एकूण २१ गावांचा टंचाई जाहीर करण्याचा प्रस्ताव प्रांत अधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आला होता. त्यापैकी सहा गावांसाठी टँकर मंजूर करण्यात आले असून संबंधित गावांमध्ये टँकर सुरू करण्याची प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती पंचायत समितीचे सभापती किरण तावरे यांनी दिली.
पंचायत समितीकडून प्रांत कार्यालयाकडे पाठवलेल्या प्रस्तावांचा पाठपुरावा केल्यानंतर गाडीखेल, सोनवडी (सुपे), देऊळगाव रसाळ, थोपटेवाडी व अंजनगाव या गावांचे टँकर प्रस्ताव मंजूर झाले आहेत. (कारखेल गावाचा प्रस्ताव सोमवारी मंजूर होण्याची शक्यता आहे.) मंजूर झालेल्या गावांमध्ये उद्यापासून टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू होणार आहे. उर्वरित टंचाईग्रस्त गावांची पाहणी करून लवकरच टँकर सुरू करण्याबाबतचा निर्णय घेतला जाणार असून त्या संदर्भातील प्रस्ताव प्रांत कार्यालयात प्रलंबित आहेत.
उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पंचायत समितीमार्फत जिरायती भागातील गावांमध्ये पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या पाण्याच्या उपलब्धतेबाबत विशेष काळजी घेण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. तसेच उर्वरित गावांचे प्रस्ताव तातडीने दाखल करण्याचे निर्देश ग्रामसेवकांना देण्यात आले आहेत.
दरम्यान, पुढील दोन दिवसांत जिरायती भागाचा दौरा करून पिण्याचे पाणी व जनावरांच्या चाऱ्याची परिस्थिती पाहणी करणार असल्याचे सभापती किरण तावरे यांनी सांगितले.
