सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
बारामती : प्रतिनिधी
पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखा आणि बारामती शहर पोलिसांनी संयुक्त कारवाई करत आंतरराष्ट्रीय गांजा तस्करी करणाऱ्या टोळीचा मोठा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत तब्बल ६३४ किलो ग्रॅम गांजा, दोन चारचाकी वाहने आणि इतर मुद्देमाल असा एकूण सुमारे ३ कोटी ३ हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला असून सात आरोपींना अटक करण्यात आली आहे.
‘नशामुक्त भारत अभियान’ अंतर्गत पुणे ग्रामीण पोलिसांकडून अमली पदार्थांविरोधात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने बारामती शहर पोलिस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. बारामती तालुक्यातील जळोची पिंपळी रोड परिसरातील भारत कांबळे यांच्या शेतातील प्लास्टिकच्या ड्रममध्ये सुमारे ४७८ किलो गांजा लपवून ठेवण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकून सुमारे २ कोटी ३१ लाख रुपयांचा गांजा जप्त केला.
तपासादरम्यान गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी प्रकाश ऊर्फ पप्पू मोहन कांटे, समाधान धर्मराज गायकवाड, प्रियकुमार मुन्ना सिंह आणि राहुल कल्याण गोरे यांना ताब्यात घेतले. चौकशीत आरोपींनी साथीदारांच्या मदतीने छत्तीसगडमधून गांजा आणून महाराष्ट्रात विक्रीसाठी साठवून ठेवल्याची कबुली दिली. यानंतर पोलिसांनी दोन इनोव्हा कारचा पाठलाग करून आणखी कारवाई केली. सांगली स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीने एका वाहनातून १३४ किलो गांजा जप्त करण्यात आला. तर दुसऱ्या कारवाईत फलटण रोडवरील गावडे चौक परिसरातून २३ किलो गांजा हस्तगत करण्यात आला. या दोन्ही कारवायांमध्ये आणखी आरोपींना अटक करण्यात आली.
या संपूर्ण कारवाईत पोलिसांनी एकूण ६३४ किलो गांजा, दोन चारचाकी वाहने आणि इतर साहित्य असा ३ कोटी रुपयांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपींकडून पश्चिम महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांत गांजा पुरवठा केला जात असल्याची प्राथमिक माहिती तपासात पुढे आली आहे. ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक संदीप सिंह गिल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व बारामती शहर पोलिसांच्या पथकाने केली. पुढील तपास सुरू आहे.
