Purandar Breaking l लग्नाच्या आनंदावर काळाचा घाला : वीरच्या मायलेकांचा द्रुतगती महामार्गावर दुर्दैवी अंत

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
पुरंदर : प्रतिनिधी
चारच दिवसांपूर्वी मोठ्या उत्साहात विवाहबंधनात अडकलेल्या युवकाचा आणि त्याच्या आईचा पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर भीषण अपघातात मृत्यू झाल्याने वीर गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आनंद, उत्साह आणि मंगलध्वनींनी भारावलेल्या हाके कुटुंबावर क्षणार्धात शोककळा पसरली. या दुर्घटनेत नववधू आणि चालक थोडक्यात बचावले असून संपूर्ण पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे. 
      पुरंदर तालुक्यातील वीर येथील जनसेवा ग्रामीण बिगर शेती पतसंस्थेच्या संचालिका सुनिता विजय हाके (वय ४९) आणि त्यांचे चिरंजीव ॲड. विराज विजय हाके (वय २९) यांचा पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावरील खालापूर टोलनाका परिसरात झालेल्या भीषण अपघातात जागीच मृत्यू झाला. गुरुवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास हा अपघात घडला. 
        मिळालेल्या माहितीनुसार, पुढील ट्रक अचानक थांबल्याने कारचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. भरधाव कार आडवी होऊन पुढील ट्रकवर जोरात आदळली. या भीषण धडकेत चालकाच्या शेजारी बसलेले ॲड. विराज हाके आणि मागील सीटवर बसलेल्या त्यांच्या आई सुनिता हाके यांचा जागीच मृत्यू झाला. तर विराज हाके यांची नववधू आणि चालक हे गंभीर दुर्घटनेतून बचावले. विशेष म्हणजे, ॲड. विराज हाके यांचा विवाह अवघ्या चार दिवसांपूर्वी मोठ्या आनंदात पार पडला होता. घरात अजूनही लग्नाचा उत्साह कायम असतानाच नियतीने घाला घातल्याने हाके कुटुंबासह संपूर्ण वीर गाव शोकसागरात बुडाले आहे. लग्नाच्या आठवणी ताज्या असतानाच अंत्यविधीची वेळ आल्याने गावकऱ्यांचे डोळे पाणावले. 

सुनिता हाके या जनसेवा ग्रामीण बिगर शेती पतसंस्थेच्या संचालिका म्हणून कार्यरत होत्या. सामाजिक, सहकार आणि विविध उपक्रमांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग होता. तर ॲड. विराज हाके हे मुंबई उच्च न्यायालयात वकिली करत होते. अनेक क्लिष्ट प्रकरणांमध्ये त्यांनी आपल्या अभ्यासपूर्ण कामगिरीची छाप निर्माण केली होती. 

        जनसेवा पतसंस्थेचे चेअरमन बाळासाहेब गुळदगड यांच्या सुनिता हाके या कन्या, तर विराज हाके हे नातू होत. या दुर्दैवी घटनेनंतर वीरसह परिसरातील सामाजिक, राजकीय, सहकार, कृषी आणि शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी हाके कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी होत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. 
To Top