Baramati News l कुंकू लावायला आले आणि हळद लावून नेली ! वाणेवाडीत साखरपुड्याचे रूपांतर विवाहमध्ये

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
आजच्या काळात लग्नसमारंभ मोठ्या थाटात करण्याची पद्धत रूढ झाली आहे. लग्नसमारंभावर लाखो रुपये खर्च केले जातात. पण गोसावी समाजातील घाडगे व चव्हाण परिवाराने बडेजावपणा व अनावश्‍यक खर्चाला फाटा देत "चट मंगनी पट ब्याह' करून साखरपुड्याच्या कार्यक्रमातच वधूवरांचे लग्न लावून समाजासमोर एक आदर्श निर्माण केले आहे. 
कुंकू लावायला आले आणि हळद लावून नेली' ही लोकप्रिय म्हण लागू झाली ती वाणेवाडी ( ता. बारामती ) येथील विकासनगर येथे. वाणेवाडी - विकासनगर येथील चंद्रकांत घाडगे यांची मुलगी माधुरी हिच्याशी सातारा जिल्ह्यातील नागेवाडी येथील मोहन चव्हाण यांचा मुलगा मनोज याचा साखरपुडा ( टिळा कार्यक्रम ) निश्चित झाला होता. 
साखरपुड्याच्या कार्यक्रमात लग्न लावण्याचे प्रस्ताव नातेवाईकांनी मांडले. यावेळी दोन्हीकडील कुटुंबांनी लग्नातील वारेमाप खर्चाला फाटा देत संमती दर्शवली. त्यानंतर लगीनघाईची लगबग सुरू होऊन योगायोगाने आचारी, वाजंत्रीसह लग्न लावणारे भडजी उपलब्ध झाले. 

यावेळी बारामती दूध संघाचे माजी अध्यक्ष पोपटराव भोसले, शब्बीर मुलाणी, शंकर बामणे, पतंग शिंदे, राजेश भोसले, बाबा बामणे, रघुनाथ घाडगे,  जयसिंग बामणे, प्रकाश घाडगे, संजय चव्हाण, दिलीप शिंदे, आप्पा चव्हाण, उत्तम घाडगे, रमेश घाडगे, वीरचंद मकवाणे, संतोष शिंदे आदी उपस्थित होते. साखरपुड्याच्या कार्यक्रमातच वधूवरांनी साध्या पद्धतीने केलेले लग्नाचे कौतुक धावत्या सोशल मीडियात होत आहे.
   

•मंगल विवाहाच्या बंधनात व मंगळसुत्राच्या धाग्यात आपुलकीचा चुडा भरून ओल्या हळदीच्या पावलांनी उंबरठा ओलांडून, आईच्या कौतुकाची लेणी लेउन, मायेच्या पित्याचा शालू नेसून वधूराणी हिने वराच्या अंगणांत सोनेरी पावलांनी, संसाराच्या वेलीवर साखरपुड्याच्या कार्यक्रमातच अकल्पित झालेल्या लग्नात पहिले पाऊल टाकले.
To Top