सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
पुणे : प्रतिनिधी
पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात उघडकीस आलेल्या विषारी दारू विक्री प्रकरणाची गंभीर दखल घेत दोन्ही शहरांच्या पोलीस आयुक्तांनी मोठी प्रशासकीय कारवाई केली आहे. कर्तव्यात निष्काळजीपणा, पर्यवेक्षणाचा अभाव आणि अवैध धंद्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यात अपयश आल्याचा ठपका ठेवत एकूण ९ पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्यात आले आहे.
या कारवाईमुळे पोलीस दलात मोठी खळबळ उडाली असून अवैध व्यवसायांना पाठीशी घालणाऱ्यांना कडक इशारा देण्यात आल्याचे मानले जात आहे. पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विषारी दारू प्रकरणाची गंभीर दखल घेत तीन अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली. यामध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले, सहाय्यक पोलीस निरीक्षक हसिना शिकलगार आणि पोलीस उपनिरीक्षक हसन मुलाणी यांचा समावेश आहे. त्यांच्या कार्यक्षेत्रात अवैध व विषारी दारूची विक्री सुरू असताना योग्य प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात अपयश आल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
दरम्यान, पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनीही दापोडी पोलीस चौकीशी संबंधित दोन अधिकारी आणि चार कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. यामध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय वाघमारे, फौजदार राजू भास्कर तसेच पोलीस कर्मचारी जयदीप सोनवणे, नवनाथ पोटे, सागर जाधव आणि विशाल काळे यांचा समावेश आहे.
विषारी दारू प्रकरणामुळे सोशल मीडियासह विविध माध्यमांमध्ये मोठ्या प्रमाणावर चर्चा झाली होती. या घटनेमुळे पोलीस दलाच्या प्रतिमेला धक्का बसल्याची नोंद आदेशात करण्यात आली आहे. तसेच पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्याने जनमानसातील विश्वास अबाधित ठेवण्यासाठी आणि भविष्यात अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी ही कठोर कारवाई करण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
या निर्णयामुळे अवैध धंदे चालविणाऱ्यांचे धाबे दणाणले असून संबंधित प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
