Baramati News l बारामतीचं बसस्थानक राज्यात अव्वल...! ‘स्वच्छ सुंदर बसस्थानक अभियानात एक कोटींचा मानाचा पुरस्कार

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम----- 
बारामती : प्रतिनिधी 
पुणे, दि. २९ : राज्य परिवहन महामंडळाच्या “हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बसस्थानक” अभियानात बारामती बसस्थानकाने राज्यात प्रथम क्रमांक पटकावत १ कोटी रुपयांचे पारितोषिक मिळवले आहे. “अ” वर्गातील बसस्थानकांमध्ये बारामती आगाराला तब्बल ९७ गुण मिळाले असून, या यशाबद्दल राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री Sunetra Ajit Pawar यांनी चालक, वाहक, यांत्रिक, प्रशासकीय आणि पर्यवेक्षकीय कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.
राज्य परिवहन महामंडळाकडून प्रवाशांना स्वच्छ, सुंदर आणि दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने २३ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीत राज्यभरातील सर्व बसस्थानकांमध्ये हे अभियान राबविण्यात येत आहे. स्पर्धात्मक स्वरूपाच्या या अभियानात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या बसस्थानकांना रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात येते.
बसस्थानकांच्या कामगिरीचे विविध निकषांवर सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यामध्ये स्वच्छता, सुविधा, व्यवस्थापन, नावीन्यपूर्ण उपक्रम आणि प्रवाशांसाठी उपलब्ध सेवा यांचा समावेश होता. या सर्व निकषांमध्ये बारामती बसस्थानकाने उत्कृष्ट कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला. अभियानाअंतर्गत प्रत्येक स्तरावरील तपासणी समित्यांकडून बसस्थानकांची काटेकोर तपासणी करण्यात येते. तपासणीचा कालावधी, निरीक्षणे आणि मूल्यांकनाची नोंद स्वच्छता अभियान नोंदवहीत करण्यात येते. समिती सदस्यांनी दिलेला निर्णय अंतिम मानला जातो.

तसेच, दोन किंवा अधिक बसस्थानकांना समान गुण मिळाल्यास ज्या बसस्थानकावर बस फेऱ्यांची संख्या अधिक असेल त्या बसस्थानकाला प्राधान्य दिले जाते. याशिवाय, नव्या संकल्पना आणि नावीन्यपूर्ण योजनांनाही विशेष गुण देण्यात येतात. बारामती बसस्थानकाने या सर्व बाबींमध्ये प्रभावी कामगिरी करत राज्यात अव्वल स्थान मिळवले आहे.
To Top