सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
पुणे : प्रतिनिधी
पुणे शहरात वाढत्या कचरा समस्येच्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेने महत्त्वाचा निर्णय घेत १७२ सेवकांना मुकादमपदी पदोन्नती दिली आहे. अनेक वर्षांनंतर सेवकांना मुकादम पदावर बढती देण्यात आल्याने शहरातील स्वच्छता आणि कचरा व्यवस्थापन अधिक सक्षम होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
शहरातील कचरा व्यवस्थापन, गल्लीबोळातील स्वच्छता आणि झाडणकामावर देखरेख ठेवण्याची जबाबदारी मुकादमांवर असते. मात्र मोठ्या प्रमाणावर मुकादम सेवानिवृत्त झाल्यानंतर सध्या केवळ ३१९ मुकादम कार्यरत असल्याने स्वच्छता व्यवस्थेवर परिणाम होत होता. ही कमतरता भरून काढण्यासाठी प्रशासनाने १७२ सेवकांना पदोन्नती देण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान, शहरात ओला आणि सुक्या कचऱ्यावर योग्य प्रक्रिया न होणे, विविध प्रकल्प रखडणे आणि व्यवस्थापनातील त्रुटींमुळे कचऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. अनेक भागांत कचऱ्याचे ढीग साचल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला होता. त्यानंतर प्रशासनाने यंत्रणा सक्रिय करून कचरा उचलण्याचे काम हाती घेतले. तरीही शहरातील प्रमुख रस्ते आणि गल्लीबोळांमध्ये झाडणकाम व्यवस्थित होत नसल्याचे चित्र आहे. रस्त्यांवर पालापाचोळा, प्लास्टिक, कागद, माती आणि खडे मोठ्या प्रमाणात साचत असल्याने शहर अस्वच्छ दिसत असून वाहतुकीसही धोका निर्माण होत आहे.
महापालिकेच्या झाडणकाम विभागातील सुमारे ४० टक्के कर्मचारी नियमित कामावर हजर राहत नसल्याची धक्कादायक बाबही समोर आली आहे. मात्र त्यांच्या नावाने दर महिन्याला वेतन काढले जात असल्याचे सांगितले जात आहे. या प्रकाराला आळा घालण्यासाठी महापालिकेने कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीसाठी विशेष मोबाईल ॲप विकसित केले असून त्याद्वारे हजेरी नोंदविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
