सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
पुणे : प्रतिनिधी
पुणे शहरातील महर्षीनगर परिसरात जनगणनेचे काम करणाऱ्या पुणे महानगरपालिकेच्या महिला कर्मचाऱ्याला शिवीगाळ करत मारहाण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी ५ ते १० जणांविरोधात Pune City Police अंतर्गत असलेल्या स्वारगेट पोलिस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २७ मे रोजी दुपारी तीन ते साडेचारच्या दरम्यान महर्षीनगर येथील मीनाताई ठाकरे वसाहत परिसरात ही घटना घडली. तक्रारदार महिला या Pune Municipal Corporation मध्ये कार्यरत असून सध्या सुरू असलेल्या जनगणनेच्या कामासाठी त्या परिसरात गेल्या होत्या.
यावेळी आरोपी विकास मोरे यांची पत्नी क्रांती मोरे, बहिण मुक्ता कसबे, पुतण्या अभिजीत मोरे यांनी जनगणनेच्या कामात अडथळा निर्माण करत महिला कर्मचाऱ्याला शिवीगाळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यानंतर संबंधित कर्मचारी महिला पुन्हा त्या भागात जनगणनेचे काम करण्यासाठी गेल्या असता, मागील वादाच्या रागातून मोरे कुटुंबीयांनी त्यांच्या पाठीमागून येत दगडाने मारहाण केली. तसेच लाथाबुक्क्यांनीही मारहाण करण्यात आल्याची तक्रार पोलिसांकडे देण्यात आली आहे. या प्रकरणी विकास मोरे, क्रांती मोरे, मुक्ता कसबे, लीलावती मोरे, अभिजीत मोरे तसेच अन्य पाच अनोळखी महिला व पुरुषांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस पुढील तपास करत आहेत.
दरम्यान, राज्यात जनगणनेच्या कामादरम्यान यापूर्वीही काही दुर्दैवी घटना घडल्या आहेत. कोल्हापूरचे भगवान पाटील, सांगोल्यातील राजाराम ढोले यांचा हृदयविकाराने, तर लातूरमधील सुंदरम वांगसकर यांचा अपघाती मृत्यू झाला होता. या पार्श्वभूमीवर जनगणना करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.
जनगणना कर्तव्य बजावताना मृत्यू झाल्यास संबंधित कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना १० लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान आणि अनुकंपा तत्त्वावर नोकरी देण्याची मागणी खाजगी प्राथमिक शिक्षक महासंघाकडून करण्यात आली आहे.
