सोमेश्वर रिपोर्टर टीम----
भोर : संतोष म्हस्के
देहदान हे सर्वश्रेष्ठ दान मानले जाते. याच भावनेतून भोर शहरातील सुजाता पांडुरंग पवार (वय ६१) यांच्या इच्छेप्रमाणे त्यांच्या कुटुंबीयांनी श्रीमती काशीबाई नवले हॉस्पिटल येथे देहदान करून समाजासमोर प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे. भोर तालुक्यातील देहदानाची ही पहिलीच घटना असल्याने सर्वत्र या निर्णयाचे कौतुक होत आहे.
कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, भोर येथील सुसंस्कृत कुटुंबातील तसेच जगद्गुरु रामानंदाचार्य स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांच्या शिष्या असलेल्या सुजाता पवार यांचे बुधवारी (दि.१३) हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांनी सुमारे दहा वर्षांपूर्वी रत्नागिरी जिल्ह्यातील नाणीज येथील संस्थानात स्वइच्छेने देहदानासाठी नाव नोंदणी केली होती. सुजाता पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या इच्छेचा मान राखत कुटुंबीयांनी तात्काळ देहदानाचा निर्णय घेतला. डॉ. पांडुरंग शंकर पवार, गणेश पवार, वर्षा शेवाळे, विद्या दसवडकर आणि कल्याणी गोरड यांनी कोणताही विलंब न लावता त्यांचा देह नवले हॉस्पिटलमध्ये दाखल केला. पहिल्या दिवशी नेत्रदान आणि त्वचादान करण्यात आले, तर दुसऱ्या दिवशी पूर्ण देहदानाची प्रक्रिया पार पडली.
देहदानानंतर हिंदू संस्कृतीनुसार पळस विधी करण्यात आला असून दहावा आणि तेरावा विधीही नियमितपणे करण्यात येणार असल्याचे कुटुंबीयांनी सांगितले.
नाणीज संस्थानामार्फत आतापर्यंत २०० हून अधिक व्यक्तींनी देहदान केले असून भोर तालुक्यातील ही पहिली घटना ठरली आहे. दुःखाच्या प्रसंगातही समाजोपयोगी निर्णय घेतल्याने पवार कुटुंबीयांवर सर्व स्तरांतून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
“पत्नी नाणीज येथील स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांच्या सेवेकरी होत्या. त्यांच्या इच्छेप्रमाणे आम्ही देहदानाचा निर्णय घेतला. देहदान हे सर्वश्रेष्ठ दान असल्याने कुटुंबीयांनी तात्काळ हा निर्णय घेतला,” असे डॉ. पांडुरंग पवार यांनी सांगितले.
