सोमेश्वर रिपोर्टर टीम----
बामणोली : अक्षय गोरे
कोयना धरणाच्या छत्रपती शिवाजी महाराज जलाशयात तापोळा येथे नुकतीच स्पीड बोट दुर्घटना घडली होती. यामध्ये बोट चालक रुपेश धोंडीबा तांबे (वय ४५) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. दरम्यान त्यांच्या कुटुंबीयांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून १ लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे. लवकरच ती सुपूर्द केली जाणार आहे.
या मदतीसाठी जिल्हा परिषद सदस्य अजितदादा संकपाळ, महाबळेश्वर पंचायत समितीचे उपसभापती संजयराव मोरे व गणेश उतेकर यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नांना यश आल्याने तांबे कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला आहे. बुधवार (दि. १३) सायंकाळी तापोळा परिसरात अचानक झालेल्या वादळी वाऱ्यात पर्यटकांना घेऊन जाणारी स्पीड बोट पलटी झाली होती. यावेळी घडलेल्या भीषण दुर्घटनेत मुंबईहून आलेले पर्यटक दांम्पत्य सुदैवाने बचावले, मात्र बोटीचे चालक रुपेश तांबे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. दरम्यान रुपेश तांबे यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती लक्षात घेता त्यांना मदत मिळावी यासाठी स्थानिक पदाधिकाऱ्यांनी तातडीने प्रयत्न सुरू केले होते. त्यांच्या प्रयत्नांमुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तांबे कुटुंबाला एक लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली.
या मदतीमुळे दुःखाच्या काळात कुटुंबाला काही प्रमाणात आधार मिळणार असल्याची भावना व्यक्त होत असून शासनाकडून आणखी भरीव मदत मिळण्याची मागणी होत आहे.
