सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
ईश्वरपूर : प्रतिनिधी
राज्याचे माजी मंत्री व आमदार जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या राजारामबापू पाटील ललित कला अकादमी तर्फे दिल्या जाणाऱ्या ‘लोकनेते राजारामबापू पाटील राष्ट्रीय ललित कला सन्मान २०२६’ पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. अकादमीचे निमंत्रक कवी प्रा. प्रदीप पाटील आणि कासेगाव शिक्षण संस्थेचे सचिव प्राचार्य आर. डी. सावंत यांनी ही माहिती दिली.
साहित्य, संशोधन, समीक्षा आणि मराठी भाषेच्या संवर्धनासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांची यंदाच्या पुरस्कारांसाठी निवड करण्यात आली आहे. साहित्य क्षेत्रातील दीर्घकालीन आणि महत्वपूर्ण योगदानाबद्दल प्रसिद्ध लेखक, अनुवादक व मराठी-हिंदी साहित्याचे अभ्यासक डॉ. सुनीलकुमार लवटे यांना ‘लोकनेते राजारामबापू पाटील राष्ट्रीय ललित कला जीवन गौरव सन्मान’ पुरस्कार जाहीर झाला आहे. एक लाख रुपये रोख व सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. ‘लोकनेते राजारामबापू पाटील राष्ट्रीय ललित कला सन्मान’ पुरस्कारासाठी प्रसिद्ध कवयित्री व लेखिका सिसिलिया कार्व्हालो, दक्षिण भारतातील मराठी भाषेच्या अभ्यासपूर्ण योगदानासाठी संशोधक डॉ. विवेकानंद गोपाल, कथासाहित्यातील योगदानासाठी कथाकार व कादंबरीकार डॉ. सुरेंद्र दरेकर आणि समकालीन मराठी समीक्षेतील योगदानासाठी समीक्षक प्रा. डॉ. रणधीर शिंदे यांची निवड करण्यात आली आहे. प्रत्येकी २५ हजार रुपये व सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. तसेच लेखन आणि मराठी भाषेच्या प्रसारासाठी अनंत कदम यांना ‘लोकनेते राजारामबापू पाटील राष्ट्रीय ललित कला विशेष सन्मान’ पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. या पुरस्काराचे स्वरूप १५ हजार रुपये व सन्मानचिन्ह असे आहे. प्रसिद्ध विचारवंत व संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांच्या निवड समितीने या पुरस्कारांची निवड केली.
राजारामबापू पाटील ललित कला अकादमी आणि शब्दगंध कवी मंडळ संघ यांच्या संयुक्त विद्यमाने १६ मे रोजी सायंकाळी ५ वाजता श्री तुकाराम महाराज सांस्कृतिक भवन येथे पुरस्कार वितरण समारंभ आयोजित करण्यात आला आहे. या समारंभात आमदार जयंत पाटील आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. या सन्मान पुरस्कारांचे हे चौथे वर्ष असून यापूर्वी पुणे, बडोदा आणि गोवा येथे समारंभ झाले आहेत.
स्वर्गीय राजारामबापू पाटील यांनी शिक्षण, सहकार, कृषी आणि उद्योग क्षेत्रात केलेल्या कार्याची प्रेरणा समाजापर्यंत पोहोचविणे, तसेच ललित कला व लोककलेतील प्रतिभावंतांना प्रोत्साहन देणे हा अकादमीचा उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले.
