सुपे परगणा l बेकायदा हातभट्टी दारू व्यवसायावर सुपे पोलिसांची धडक कारवाई

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सुपे : दिपक जाधव
 बारामती तालुक्यातील सुपे पोलीस ठाण्याच्या हद्दीत मंगळवारी ( दि. १२ ) बेकायदा हातभट्टी दारू व्यवसायाविरोधात धडाकेबाज कारवाई करण्यात आली. यापुढे ही मोहीम अशीच चालू राहणार असल्याने पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पवार यांनी सांगितले. 

नागरिकांनी आज झालेल्या या कारवाईचे सर्वत्र कौतुक केले. मात्र सुपे परिसरातील अवैध मटका व्यवसाय त्वरित बंद करण्याची मागणी पुढे येत आहे. याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मोरगाव परिसरातील आंबी रोड, मोरगाव गावठाण तसेच भोंडवेवाडी या विविध भागांमध्ये पोलिसांनी छापेमारी करून हातभट्टी दारू व्यवसायिकांवर कारवाईचा बडगा उगारला. येथे हातभट्टी दारूची विक्री बेकायदेशीर होत असल्याच्या पोलिसांकडे अनेकांनी तक्रारी केल्या होत्या. बेकायदा हातभट्टी दारू व्यवसाय कायमस्वरूपी बंद करण्यासाठी प्रशासनाने पावले उचलले आहेत. सुपा पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे ही मोहीम राबवत विविध ठिकाणी अचानक छापे टाकले. यावेळी हातभट्टी दारू तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य, रसायने तसेच तयार दारू जप्त करण्यात आली. काही ठिकाणी दारू निर्मितीसाठी उभारण्यात आलेली साधनेही पोलिसांनी नष्ट केली असल्याची माहिती मिळाली. या कारवाईमुळे परिसरातील बेकायदा दारू व्यवसायिकांमध्ये मोठी खळबळ उडाली असून नागरिकांनी या मोहिमेचे स्वागत केले आहे. गावांमध्ये वाढत चाललेल्या अवैध दारू विक्रीमुळे तरुण पिढी व्यसनाधीन होत असल्याची तक्रार नागरिकांकडून वारंवार करण्यात येत होती. त्यानंतर सुपे पोलिसांनी ॲक्शन मोडमध्ये येत कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पवार यांनी सांगितले की, “पोलीस स्टेशन हद्दीतील बेकायदा हातभट्टी दारू व्यवसाय कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतला जाणार नाही. 

यापुढे अशा प्रकारे दारू विक्री अथवा निर्मिती करणाऱ्यांवर गंभीर गुन्हे दाखल करण्यात येतील. नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे. बेकायदा व्यवसायाबाबत माहिती देणाऱ्यांची ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवली जाईल.” सुपे पोलीस ठाण्याच्या वतीने करण्यात आलेल्या कारवाईत सहा. पोलिस हवालदार राहुल भाग्यवंत, पो. ह. पवार, पोलीस शिपाई संतोष जावीर, तुषार जैनक आदींनी सहभाग घेतला. पोलिसांच्या या कारवाईमुळे मोरगाव परिसरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासन अधिक सतर्क झाल्याचे दिसून येत आहे.
Tags
To Top