Pune Crime l राज्य उत्पादन शुल्क विभागाचा मोठा छापा; गोवा-कर्नाटक विक्रीचे मद्य जप्त, २ कोटींचा मुद्देमाल हस्तगत

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम----
पुणे : प्रतिनिधी
पुणे विभाग राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई; २.०३ कोटींचा अवैध मद्यसाठा जप्त पुणे विभाग राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध मद्य वाहतूक आणि साठ्याविरोधात मोठी कारवाई करत सुमारे रु. २ कोटी ३ लाख ३९ हजार ८०० किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत १७१६ बॉक्स अवैध मद्यसाठा आणि दोन ६ चाकी कंटेनर वाहने जप्त करण्यात आली.
मा. आयुक्त डॉ. राजेश देशमुख, सह आयुक्त प्रसाद सुर्वे व विभागीय उप आयुक्त सागर धोमकर यांच्या निर्देशानुसार ही कारवाई करण्यात आली. प्रथम शिक्रापूर (ता. शिरूर, जि. पुणे) येथे छापा टाकून गोवा आणि कर्नाटक राज्य विक्री परवानाधारक मद्यसाठा जप्त करण्यात आला. तपासादरम्यान मिळालेल्या माहितीनुसार धुळे जिल्ह्यातील मुंबई-आग्रा महामार्ग परिसरातून एक कंटेनर ताब्यात घेण्यात आला. त्यामध्ये बिअर आणि मद्याच्या ६९६ बॉक्सचा साठा आढळून आला. यामध्ये एकुण सुमारे रु. ८१,२७,६००/- किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पुढील तपासात सांगली जिल्ह्यात महाराष्ट्र-कर्नाटक सीमेजवळ आणखी एक कंटेनर पकडण्यात आला. त्यात विविध राज्यांसाठी विक्री परवानगी असलेले मद्याचे १०१६ बॉक्स आढळून आले. वाहनांवर बनावट नंबर प्लेटचा वापर केल्याचेही निष्पन्न झाले. यामध्ये एकूण सुमारे १,२१,९९,६००/- किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या प्रकरणात महाराष्ट्र दारुबंदी कायदा, १९४९ अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून सुरू आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने नागरिकांना अवैध मद्यनिर्मिती, वाहतूक किंवा विक्रीबाबत माहिती मिळाल्यास टोल फ्री क्रमांक १८०० ८३३ ३३३ किंवा व्हॉट्सअॅप क्रमांक ८४२२००११३३ वर माहिती देण्याचे आवाहन केले आहे.
Tags
To Top