Satara News l महाबळेश्वरला जाणाऱ्यांकडून प्रवासी कर नाही; पाचगणी नगरपालिकेचा निर्णय

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम----- 
पाचगणी : सचिन भिलारे
 उन्हाळी सुट्ट्या आणि पर्यटन हंगामामुळे महाबळेश्वर-पाचगणी परिसरात पर्यटकांची मोठी गर्दी होत असताना, महाबळेश्वरला जाणाऱ्या पर्यटक वाहनांकडून पाचगणीत प्रवासी कर आकारला जात असल्याच्या तक्रारी समोर येत होत्या. या पार्श्वभूमीवर पाचगणी नगरपालिकेने महत्त्वाची स्पष्टता देत महाबळेश्वरकडे जाणाऱ्या पर्यटकांकडून कोणताही प्रवासी कर आकारला जाणार नसल्याचे जाहीर केले आहे.
पर्यटकांमध्ये निर्माण झालेला संभ्रम दूर करण्यासाठी टोल नाका परिसरात माहिती फलक उभारण्यात आले असून संबंधित कर्मचाऱ्यांनाही आवश्यक सूचना देण्यात आल्याची माहिती प्रशासनाने दिली. पाचगणी नगरपालिकेचे मुख्याधिकारी पंडित पाटील यांनी सांगितले की, “महाबळेश्वरला जाणाऱ्या पर्यटकांकडून नियमानुसार कर आकारला जाणार नाही. नियमांची स्पष्ट माहिती नसल्यामुळे काही पर्यटकांमध्ये गैरसमज निर्माण होत होता. त्यामुळे माहिती देणारे फलक लावण्यात आले आहेत. पर्यटकांना कोणतीही अडचण आल्यास त्यांनी प्रशासनाशी संपर्क साधावा.”
नगराध्यक्ष दिलीप बगाडे यांनीही पर्यटकांना दिलासा देताना सांगितले की, “महाबळेश्वर आणि पाचगणी ही राज्यातील महत्त्वाची पर्यटनस्थळे आहेत. येथे येणाऱ्या पर्यटकांना कोणत्याही प्रकारचा मनस्ताप होऊ नये, ही आमची भूमिका आहे. पर्यटकांवर अनावश्यक आर्थिक भार पडू नये यासाठी नगरपालिका प्रयत्नशील आहे.” सध्या लॉन्ग वीकेंड आणि उन्हाळी सुट्ट्यांमुळे महाबळेश्वर-पाचगणी मार्गावर वाहनांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ वाढली आहे. मुंबई, पुणे तसेच राज्यातील विविध भागांतून हजारो पर्यटक दररोज या पर्यटनस्थळांकडे येत असल्याने टोल नाक्यावर काही प्रमाणात गोंधळ निर्माण होत असल्याचे दिसून येत आहे. काही पर्यटकांनी महाबळेश्वरकडे जात असतानाही टोल आकारला जात असल्याची नाराजी व्यक्त केल्यानंतर नगरपालिका प्रशासनाने तातडीने दखल घेत स्पष्ट सूचना जारी केल्या.

दरम्यान, पर्यटन हंगामात वाढलेली वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिस प्रशासन आणि नगरपालिका यांच्या वतीने विशेष उपाययोजना करण्यात येत आहेत. वाहतूक नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.
To Top