सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
आळेफाटा : प्रतिनिधी
कौटुंबिक वाद आणि पत्नी सोडून गेल्याच्या रागातून एका निर्दयी पित्याने स्वतःच्या साडेतीन वर्षांच्या मुलीचा गळा आवळून खून केल्याची संतापजनक घटना जुन्नर तालुक्यात उघडकीस आली आहे. एवढ्यावरच न थांबता त्याने आपल्या पाच वर्षांच्या मुलालाही ठार मारण्याचा प्रयत्न केला. ही धक्कादायक घटना पुणे-नाशिक महामार्गालगत संतवाडी परिसरात घडली असून, आळेफाटा पोलिसांनी आरोपी पित्याला अटक केली आहे.
सागर सदाशिव शिंदे (वय २९, रा. गायकवाड वस्ती, मोशी, जि. पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीची पत्नी सुमारे सहा महिन्यांपूर्वी घर सोडून गेली होती. त्यानंतर दोन लहान मुलांचा सांभाळ करताना निर्माण झालेली चिडचिड आणि कौटुंबिक तणावातून सागरने टोकाचे पाऊल उचलल्याचे समोर आले आहे. मंगळवारी (५ मे) सकाळी साडेदहाच्या सुमारास सागर शिंदे याने मुलगा आर्यन (वय ५) आणि मुलगी हर्षदा (वय ३.५) यांना फिरायला घेऊन जात असल्याचे सांगून घराबाहेर नेले. रात्री उशिरा त्याने दोन्ही मुलांना संतवाडी येथील निर्जन जंगल परिसरात नेले. तेथे प्रथम मुलगा आर्यनचा गळा दाबून त्याला ठार मारण्याचा प्रयत्न केला. आर्यन बेशुद्ध पडल्याने तो मृत झाल्याचे समजून आरोपीने त्याला तेथेच टाकून दिले. यानंतर आरोपीने स्वतःच्या चिमुकल्या मुलगी हर्षदाचा गळा आवळून निर्घृण खून केला. पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने तिचा मृतदेह झाडाझुडपात फेकून दिला.
बुधवारी सकाळी संतवाडी परिसरात एक लहान मुलगा बेवारस अवस्थेत आढळून आल्यानंतर आळेफाटा पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. पोलिसांनी मुलाला ताब्यात घेत चौकशी केली असता संपूर्ण प्रकार उघडकीस आला. त्यानंतर आरोपी सागर शिंदे याला ताब्यात घेण्यात आले. सुरुवातीला त्याने पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला, मात्र कसून चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
आरोपीने दाखवून दिलेल्या ठिकाणावरून पोलिसांनी हर्षदाचा मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. या प्रकरणी आळेफाटा पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध खून आणि खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल पन्हाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, या अमानवी घटनेमुळे परिसरात संताप आणि हळहळ व्यक्त होत आहे.
