सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
पुणे : प्रतिनिधी
पुणे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा धक्कादायक प्रकार समोर आला असून, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्या अटकपूर्व जामिनाला विरोध करताना पोलिसांनी दुसऱ्याच व्यक्तीच्या गुन्ह्याचा आधार घेतल्याचे उघड झाले आहे. हा प्रकार नजरचुकीने झाल्याचे स्पष्टीकरण पोलिसांकडून देण्यात आले आहे.
वारकरी संप्रदायाबद्दल सोशल मीडियावर आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी लवांडे यांच्याविरोधात ८ मे रोजी वाघोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात अटक टाळण्यासाठी त्यांनी न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता.
या अर्जाला विरोध करताना पोलिसांनी लवांडे यांच्यावर जुने गुन्हे प्रलंबित असल्याचा दावा न्यायालयात केला. २०१७ मध्ये नथुराम गोडसे विरोधातील आंदोलनप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा क्रमांक ३२/१७ दाखल झाला होता. मात्र, हा गुन्हा राज्य शासनाने २०२२ मध्ये मागे घेतला असल्याची माहिती समोर आली आहे. तरी देखील पोलिसांनी न्यायालयात गुन्हा क्रमांक ३२/१७ ऐवजी ३३/१७ सादर केला. हा गुन्हा दुसऱ्याच आरोपीशी संबंधित होता आणि त्या प्रकरणात संबंधित आरोपी निर्दोष मुक्त झाल्याचेही स्पष्ट झाले आहे.
या प्रकारामुळे पोलिसांनी न्यायालयाची दिशाभूल केल्याचा आरोप करत विकास लवांडे आणि त्यांचे वकील ॲड. मिलिंद पवार यांनी पुणे जिल्हा व सत्र न्यायालयात शपथपत्र दाखल केले. तसेच वाघोलीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गायकवाड आणि उपनिरीक्षक अमोल काळे यांच्याविरोधात न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. संबंधित अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात यावी, अशी विनंतीही अर्जाद्वारे करण्यात आली आहे.
या प्रकरणाची दखल घेत न्यायालयाने संबंधित पोलिस अधिकाऱ्यांना ३० मेपर्यंत म्हणणे सादर करण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, शुक्रवारी (दि. २२) विकास लवांडे यांना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एन. एस. बारी यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.
