Satara News l स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीणमध्ये सातारा जिल्हा देशाच्या पश्चिम विभागात अव्वल

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम----- 
सातारा : प्रतिनिधी 
स्वच्छ भारत मिशन अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या ‘स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण’ स्पर्धेत सातारा जिल्ह्याने देशाच्या पश्चिम विभागात प्रथम क्रमांक पटकावत महाराष्ट्रातही अव्वल स्थान मिळवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. प्रिया शिंदे यांनी ही माहिती दिली.
          या उल्लेखनीय यशाबद्दल डॉ. प्रिया शिंदे यांच्यासह उपाध्यक्ष राजू भोसले, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, शिक्षण व अर्थ सभापती तेजीस्विनी कदम, समाजकल्याण सभापती ऋषिकेश धायगुडे, महिला व बालकल्याण सभापती ऋतुजा शिंदे तसेच कृषी सभापती लता कर्णे यांनी जिल्हावासियांचे अभिनंदन केले.
            स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण अंतर्गत केंद्रीय समितीकडून विविध निकषांच्या आधारे १००० गुणांचे मूल्यांकन करण्यात आले होते. यामध्ये गावांमधील ओला व सुका कचरा वर्गीकरण, घरगुती कचरा संकलन व्यवस्था, घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन, प्लास्टिक कचरा निर्मूलन, सार्वजनिक स्वच्छता, शौचालयांचा वापर व देखभाल, स्वच्छतेबाबत जनजागृती, लोकसहभाग, शाळा व अंगणवाडी स्वच्छता तसेच नाविन्यपूर्ण उपक्रमांचा समावेश होता. जिल्ह्यात अनेक गावांमध्ये प्रभावी कचरा संकलन व्यवस्था उभारण्यात आली असून, ओल्या कचऱ्यापासून खत निर्मिती तसेच सुका कचरा पुनर्चक्रणासाठी पाठवण्याची यंत्रणा विकसित करण्यात आली आहे. सांडपाणी व्यवस्थापनासाठी शोषखड्डे, रूट झोन, टीबीएफ, डीवॅट आणि ग्रेवॉटर व्यवस्थापन प्रकल्पही विविध गावांमध्ये उभारण्यात आले आहेत. स्वच्छतेबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी ग्रामसभा, रॅली, शाळा अभियान, स्वच्छता शपथ, भित्तीचित्रे आणि लोकसहभागातून विविध उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात आले.

या यशामध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांचे मार्गदर्शन लाभले असून अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गावडे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक विश्वास सिद, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) प्रज्ञा माने, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) राहुल देसाई, कार्यकारी अभियंता गौरव चक्के यांच्यासह सर्व खाते प्रमुख, अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मोलाचे योगदान असल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले.
To Top