Pune Satara Highway l पुणे-सातारा महामार्गावरील वाहतूक कोंडी हटणार; पाच ते सहा उड्डाणपुलांमुळे प्रवास अवघ्या एका तासात..!

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम----- 
खंडाळा : प्रतिनिधी 
पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील वाढती वाहतूक कोंडी आणि वारंवार होणारे अपघात लक्षात घेऊन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने मोठे पाऊल उचलले आहे. केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री यांनी नुकतीच खंबाटकी घाट आणि नवले पूल परिसराची पाहणी करून वाहतूक समस्यांचा आढावा घेतला. त्यानंतर पुणे ते सातारा मार्गावरील पाच ते सहा महत्त्वाच्या ठिकाणी उड्डाणपूल उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या प्रकल्पासाठी तब्बल सहा हजार कोटी रुपयांचा डीपीआर (सविस्तर प्रकल्प अहवाल) तयार करण्यात येत असून, प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पुणे ते सातारा प्रवास अवघ्या एका तासात पूर्ण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. महामार्गावरील वाढती वाहनसंख्या, जड वाहतूक आणि सततची कोंडी यामुळे प्रवाशांचा मोठ्या प्रमाणावर वेळ वाया जात होता. ही समस्या कायमची सोडवण्यासाठी केंद्र सरकार आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून विविध उपाययोजना राबवण्यात येत आहेत.
खंडाळा, शिरवळ आणि इतर वाहतूक कोंडीच्या ठिकाणी स्वतंत्र बहुपदरी उड्डाणपूल उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच सातारा-पुणे वेस्टर्न बायपास प्रकल्पाचाही आराखडा तयार करण्यात येत असून, सुमारे १४० किलोमीटरचा नवा मार्ग उभारण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या प्रकल्पामुळे जड वाहतूक शहराबाहेरून वळवली जाणार असल्याने मुख्य मार्गावरील ताण कमी होणार आहे.
महामार्गावरील ब्लॅक स्पॉट हटवणे, आवश्यक ठिकाणी उड्डाणपूल उभारणे आणि वाहतूक सुरळीत करण्यासाठी इतर पायाभूत सुविधा उभारण्याचे नियोजन सुरू आहे. औद्योगिक व मालवाहतूक ट्रकांमुळे निर्माण होणारी गर्दी कमी करण्यासाठीही हा प्रकल्प महत्त्वाचा ठरणार आहे.

“केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या सूचनेनुसार डीपीआर तयार करण्याचे काम प्रस्तावित आहे. आवश्यक त्या ठिकाणी उड्डाणपूल आणि इतर उपाययोजना झाल्यानंतर सातारा ते पुणे अंतर एका तासात पार करता येऊ शकते,” अशी माहिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे वरिष्ठ अभियंता सुहास घंटे यांनी दिली.
To Top