सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सातारा : प्रतिनिधी
कोरेगाव येथे बोगस कॉल सेंटर थाटून अमेरिकन नागरिकांची ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीचा सातारा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी 21 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पाच जणांना अटक करण्यात आली आहे. आरोपींकडून तब्बल 35 लाख 34 हजार रुपयांची रोकड व इतर मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
जिल्हा पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी पत्रकार परिषदेत या कारवाईची माहिती दिली. अटक करण्यात आलेल्यांमध्ये सागर सूर्यवंशी (वय 33, रा. मानखुर्द पश्चिम, मुंबई), विरेंद्र बोडरे (27, गोवंडी, मुंबई), अक्षय भंडारी (28, गोवंडी, मुंबई), मनिष जोशी (28, डुंगरपूर, राजस्थान) आणि रितेश चौहान (26, नालासोपारा, मुंबई) यांचा समावेश आहे. यातील सागर सूर्यवंशी हा या बोगस कॉल सेंटरचा मालक असून तोच संपूर्ण फसवणूक रॅकेटचा मास्टरमाईंड असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरेगाव-रहिमतपूर रस्त्यावरील सुभाषनगर येथील रिलायबल अपार्टमेंटच्या चौथ्या मजल्यावर ‘श्रीसाई लॉजिस्टीक्स अँड कन्सल्टंस एलएलपी’ या नावाने हे बोगस कॉल सेंटर फेब्रुवारी 2026 पासून सुरू होते. येथून अमेरिकन नागरिकांना ऑनलाईन ॲपच्या माध्यमातून संपर्क साधून “तुम्ही ॲमेझॉनवरून वस्तू ऑर्डर केली असून त्याचे पैसे भरावे लागतील” अशी भीती दाखवत आर्थिक फसवणूक केली जात होती. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विश्वजीत घोडके यांच्या नेतृत्वाखाली पोलिस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे यांच्या विशेष पथकाने 23 मे रोजी या ठिकाणी छापा टाकला. त्यावेळी 17 पुरुष व 4 महिला अमेरिकन नागरिकांशी संपर्क साधून ऑनलाईन फसवणूक करत असल्याचे उघड झाले.
या प्रकरणात गुरुप्रसाद राणे, शमशुद्दीन सय्यद, गौरव लांडगे, अभिषेक गुप्ता, इशांत खांडेकर, बाबू चलवादी, अवि वानखेडे, दीपक खंडारे, मोहम्मद शफिक कोकणे, ओमकार घार्गे, दिपेन जाधव, लेबीन सायमन यांच्यासह चार महिला आरोपींवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलिस अधीक्षक वैशाली कडुकर आणि उपविभागीय पोलिस अधिकारी राजश्री तेरणी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विश्वजीत घोडके, पोलिस निरीक्षक अरुण देवकर, पोलिस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे यांच्यासह पोलिसांच्या विशेष पथकाने ही मोठी कारवाई यशस्वी केली.
