Baramati Breaking l दोन बहिणींनंतर लहान भावाचीही मृत्यूशी झुंज अपयशी; बोडरे कुटुंबातील तिन्ही भावंडांचा दुर्दैवी अंत

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
निरा–मोरगाव राज्य मार्गावरील चौधरवाडी फाटा येथे शनिवारी (दि. ६) सायंकाळी झालेल्या भीषण अपघातात दोन सख्या बहिणींचा जागीच मृत्यू झाला होता. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या त्यांच्या लहान भावाचा देखील पुण्यात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने बोडरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या हृदयद्रावक घटनेमुळे फलटण तालुक्यातील मुरूमसह संपूर्ण पंचक्रोशीत शोककळा पसरली आहे.
 मुरूम (ता. फलटण) येथील सेजल ज्ञानेश्वर बोडरे (वय १७), अक्षरा ज्ञानेश्वर बोडरे (वय १५) आणि त्यांचा भाऊ पवन ज्ञानेश्वर बोडरे (वय १२) हे बारामती तालुक्यातील मुर्टी येथील मामाच्या गावाला जाण्यासाठी इलेक्ट्रिक स्कुटीवरून निघाले होते. 
चौधरवाडी फाट्याजवळ त्यांच्या स्कुटीची आणि आयशर टेम्पो यांची समोरासमोर भीषण धडक झाली होती या भीषण अपघातात सेजल व अक्षरा या दोन्ही बहिणींचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर पवन गंभीर जखमी झाला होता त्याला तातडीने बारामती येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी पुण्यातील रुग्णालयात हलविण्यात आले होते.
मात्र मृत्यूशी सुरू असलेली त्याची झुंज अखेर अपयशी ठरली आणि मंगळवार (दि. ९) रात्री १.३० वाजता उपचारादरम्यान पवनचेही दुःखद निधन झाले. त्यामुळे या अपघातात एकाच कुटुंबातील तिन्ही सख्या भावंडांचा मृत्यू झाल्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे.
या दुर्दैवी अपघातामुळे मुरूम येथील बोडरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. रविवारी दुपारी मुरूम गावातील स्मशानभूमीत सेजल व अक्षरा यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर पवनच्या निधनाच्या वृत्ताने गावावर पुन्हा शोककळा पसरली आहे पवन अभ्यासात चांगला आणि सर्वांचा लाडका होता.मात्र नियतीने घातलेल्या एका घावाने तिन्ही भावंडांची स्वप्ने कायमची अधुरी राहिली. एका क्षणात झालेल्या या भीषण अपघाताने बोडरे कुटुंबाचे आयुष्य पूर्णपणे उद्ध्वस्त झाले असून संपूर्ण परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. तीन निष्पाप जीवांचा झालेला दुर्दैवी अंत अनेकांच्या मनाला चटका लावून गेला आहे.
To Top