सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
इंदापूर : संतोष माने
इंदापूर, ता. १० : राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार इंदापूर तालुक्यातील सन २०२४, २०२५ आणि २०२६ मध्ये मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकांसाठी सदस्यांच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम १२ जून रोजी होणार आहे. यासाठी तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी जीवन बनसोडे यांनी सुधारित आदेश काढत तालुक्यातील ८१ ग्रामपंचायतींसाठी अध्यासी अधिकारी व सहाय्यक अध्यासी अधिकारी नियुक्त केले आहेत.
राज्य निवडणूक आयोगाने ग्रामपंचायत सदस्य आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर केल्यानंतर सुरुवातीला ६१ ग्रामपंचायतींसाठी आदेश जारी करण्यात आले होते. मात्र, जिल्हाधिकारी पुणे (ग्रामपंचायत शाखा) यांच्या सूचनेनुसार २०२४ व २०२५ मध्ये मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींचाही प्रक्रियेत समावेश करण्यात आला. त्यामुळे आता तालुक्यातील एकूण ८१ ग्रामपंचायतींच्या सदस्य आरक्षणाची सोडत काढली जाणार आहे.
या प्रक्रियेसाठी कृषी अधिकारी, मंडळ अधिकारी, विस्तार अधिकारी, कृषी पर्यवेक्षक तसेच ग्रामविकास विभागातील विविध अधिकाऱ्यांची अध्यासी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना सहाय्य करण्यासाठी ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकाऱ्यांचीही नेमणूक करण्यात आली आहे.
तालुक्यातील सराफवाडी, घोरपडवाडी, भिगवण, पोंधवडी, शेटफळगढे, लासुर्णे, वालचंदनगर, कळंब, पीठेवाडी, निमसाखर, निमगाव केतकी, गोतोंडी, सणसर, निंबोडी, गिरवी, नरसिंहपूर, गलांडवाडी, पिंपळे, निरगुडे, लोणी देवकर, बळपुडी, भावडी, कुंभारगाव, भादलवाडी, अकोले, बाभूळगाव, कडबनवाडी, काटी, जाधववाडी, भांडगाव, भोडणी, गोंदी, दगडवाडी, निरवांगी, चिखली, तावशी, तक्रारवाडी, तरंगवाडी, कळस, रुई, अंथुर्णे, पळसदेव, रेडा, चाकाटी, कालठण, खोरोची, वडापुरी, पंधरवडी, शेटफळ हवेली, गोखळी, अवसरी, भाटनिमगाव, निरनिमगाव, सुरवड आदी ग्रामपंचायतींचा या प्रक्रियेत समावेश आहे.
आरक्षण सोडतीच्या प्रक्रियेत अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागास प्रवर्ग तसेच महिलांसाठी राखीव जागांचे निर्धारण करण्यात येणार आहे. त्यानुसार आगामी ग्रामपंचायत निवडणुकांचा आराखडा निश्चित होणार असून तालुक्यातील राजकीय हालचालींनाही वेग येण्याची शक्यता आहे. तहसील प्रशासनाने नियुक्त अध्यासी अधिकाऱ्यांना ग्रामपंचायतींमध्ये विशेष सभा घेऊन आरक्षण निश्चितीची प्रक्रिया पारदर्शकपणे पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत.
"
आरक्षण सोडत प्रक्रिया नियमानुसार व पारदर्शक पद्धतीने राबविण्यात येणार असून सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी नियोजित वेळेत कार्यवाही पूर्ण करावी,
- तहसीलदार जीवन बनसोडे
