Satara News l बनावट बँक शिक्क्यांद्वारे जिल्हा परिषदेची ८ लाखांची फसवणूक; लघू पाटबंधारे विभागात खळबळ

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम----- 
सातारा : प्रतिनिधी 
जिल्हा परिषदेच्या लघू पाटबंधारे विभागातील कंत्राटी कामांमध्ये सुमारे ७ ते ८ लाख रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहाराचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अतिरिक्त सुरक्षा ठेव जमा केल्याचे भासवण्यासाठी एका ठेकेदाराने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या बनावट शिक्क्यांसह खोटे दस्तऐवज तयार केल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले आहे. या प्रकारामुळे जिल्हा परिषद प्रशासनात खळबळ उडाली असून ठेकेदारी व्यवस्थेतील अनियमितता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
लघू पाटबंधारे विभागामार्फत ग्रामीण भागातील सिंचन, जलसंधारण आणि भूजल पातळी वाढविण्यासाठी विविध कामे हाती घेतली जातात. या कामांसाठी दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च केला जातो. विभागाकडून मंजूर होणाऱ्या कामांसाठी संबंधित ठेकेदारांना अतिरिक्त सुरक्षा ठेव जमा करणे बंधनकारक असते.
मात्र, ही रक्कम प्रत्यक्षात न भरता एका ठेकेदाराने बनावट चलने आणि जिल्हा बँकेचे खोटे शिक्के वापरून पैसे भरल्याचा बनाव केल्याचे समोर आले आहे. सुमारे सहाहून अधिक चलनांमध्ये हा प्रकार आढळून आला असून अतिरिक्त सुरक्षा ठेव आणि सुरक्षा ठेवीपोटी ७ ते ८ लाख रुपये जमा केल्याचे खोटे दाखवण्यात आले आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेची लाखो रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित ठेकेदार फलटण तालुक्यातील असून त्याने घेतलेले काम पुढे दुसऱ्या ठेकेदाराला दिले होते. त्यानंतर संबंधित कामगाराकडे चलन भरण्याची जबाबदारी सोपवण्यात आली. या कामगारानेच बनावट शिक्के तयार करून पैसे भरल्याचा बनाव केल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे या गैरव्यवहारामागे मोठे रॅकेट कार्यरत असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

या प्रकरणामुळे विभागातील कागदपत्र पडताळणी प्रक्रियेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. चलने बनावट असू शकतात तर निविदा प्रक्रियेदरम्यान सादर करण्यात आलेली इतर कागदपत्रेही संशयाच्या भोवऱ्यात आली आहेत. त्यामुळे संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाकणे, त्याला यापूर्वी देण्यात आलेल्या सर्व कामांची चौकशी करणे, प्रलंबित बिले रोखून धरणे तसेच झालेल्या नुकसानीची वसुली करून फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे.

दरम्यान, बनावट शिक्के कोठून तयार करण्यात आले, हा प्रकार किती काळापासून सुरू होता आणि आणखी किती ठेकेदारांनी अशाच प्रकारे शासनाची फसवणूक केली आहे का, याचा शोध घेण्यासाठी सखोल चौकशीची आवश्यकता व्यक्त केली जात आहे.उपशीर्षक: अतिरिक्त सुरक्षा ठेव भरल्याचा बनाव; सहा चलनांमध्ये गैरव्यवहार उघड, सखोल चौकशीची मागणी
To Top