Sugar Factory l उद्या 'सोमेश्वर'च्या उपाध्यक्षपदाची निवड; बारामती की पुरंदरला संधी ? उपाध्यक्षपदासाठी 'ही' नावे चर्चेत

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष मिलिंद कांबळे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या जागेवर उद्या गुरुवारी दि. ११ रोजी नव्या उपाध्यक्षाची निवड होणार आहे. कारखान्याच्या सभागृहात होणाऱ्या संचालक मंडळाच्या बैठकीत नव्या उपाध्यक्षांची निवड होणार असून उपाध्यक्षपदी कोणाची निवड होणार याकडे सभासदांचे लक्ष लागून राहिले आहे. 
रिक्त झालेल्या या पदासाठी इच्छुक संचालकांनी हालचाली वाढवल्या असून, उपाध्यक्षपदासाठी विविध स्तरावर प्रयत्न सुरू असल्याची चर्चा कारखाना परिसरात रंगत आहे. अंतिम निर्णय उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या भूमिकेवर अवलंबून असून त्या कोणाला संधी देतात हे गुरुवारी स्पष्ट होणार आहे. चार महिन्यावर कारखाना निवडणूक येऊन ठेपली असल्याने नव्या उपाध्यक्षाना केवळ तीनच महिने कामकाज पाहता येणार आहे. बारामती किंवा पुरंदर तालुक्याला संधी मिळण्याची शक्यता आहे. 
यामध्ये गट नंबर एक मधून पुरंदर तालुक्यातील गुळुंचे येथील जितेंद्र निगडे तसेच गेली पाच टर्म कारखान्यात संचालक म्हणून काम करणारे पुरंदर तालुक्यातील मांडकी येथील विश्वास जगताप यांच्या नावाची देखील चर्चा आहे. जातीय समीकरणाची सांगड घालण्याचा प्रयत्न केला गेला तर पुरंदर तालुक्यातील जेऊर येथील अनंत तांबे व बारामतीच्या जिरायत भागातून मोरगाव-तरडोली येथील किसन तांबे यांना देखील संधी मिळू शकते.  
               दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनानंतर कारखान्याच्या निवड प्रक्रियेची सूत्रे सुनेत्रा पवार यांच्या हाती आहेत. त्यामुळे या निवडीला संघटनात्मक आणि राजकीय दृष्टिकोनातून विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. बारामती, पुरंदर, खंडाळा आणि फलटण या चार तालुक्यांच्या कार्यक्षेत्रात विस्तारलेल्या या अग्रेसर कारखान्यातील उपाध्यक्षपदाला विशेष महत्त्व राहिले आहे. मागील काळात आनंदकुमार होळकर, प्रणिता खोमणे, बाळासाहेब कामठे आणि मिलिंद कांबळे यांनी उपाध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली. प्रत्येक वर्षी एका संचालकाला उपाध्यक्षपदी संधी देण्याची भूमिका पूर्वी अजितदादा पवार यांनी मांडली होती. त्यामुळे आता नव्या निवडीकडे उत्सुकता अधिक वाढली आहे. दरम्यान, १२ ऑक्टोबर २०२१ रोजी झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीनंतर आता पुन्हा निवडणुकीचे वारे वाहू लागले असून सप्टेंबर पासून निवडणूक प्रक्रियेची तयारी सुरू होणार आहे.
To Top