सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील वाघळवाडी, करंजे आणि मुर्टी या गावांमध्ये रविवारी मध्यरात्री चोरट्यांनी धुमाकूळ घालत तीन ठिकाणी घरफोड्या केल्या. या सलग चोरीच्या घटनांमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, चोरट्यांनी नेमका किती ऐवज लंपास केला याचा तपशील अद्याप समोर आलेला नाही. मात्र एकाच वेळी तीन गावातील घरफोड्यामुळे चोरट्यांनी वडगाव निंबाळकर पोलिसांपुढे आव्हान उभे केले आहे.
गेल्या काही वर्षांपासून या परिसरात चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली असून, अनेक घरफोड्यांचा तपास अद्यापही पूर्ण झालेला नाही. त्यामुळे चोरट्यांचे मनोबल वाढल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. वारंवार घडणाऱ्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे.
करंजेपूल पोलीस चौकीच्या हद्दीत घडलेल्या या घटनांमुळे वडगाव पोलीस ठाण्यासमोर चोरट्यांचा शोध घेण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. या तिन्ही घटनांचा सखोल तपास करून आरोपींना तातडीने अटक करावी, तसेच परिसरात रात्रीची पोलीस गस्त वाढवून चोरीच्या घटनांना आळा घालावा, अशी मागणी वाघळवाडी, मुर्टी आणि करंजे येथील ग्रामस्थांनी केली आहे.
दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळांची पाहणी करून तपास सुरू केला असून, संशयितांचा शोध घेण्यासाठी विविध पथके कामाला लागल्याची माहिती मिळाली आहे. चोरीमागील टोळीचा लवकरात लवकर पर्दाफाश करण्याची अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
