सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
पुणे : प्रतिनिधी
पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे अवघ्या साडेतीन वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केल्याप्रकरणी दोषी ठरलेल्या भीमराव प्रभाकर कांबळे याला पुण्यातील शिवाजीनगर येथील विशेष न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. या अत्यंत संवेदनशील आणि राज्यभरात संतापाची लाट निर्माण करणाऱ्या प्रकरणात विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंके यांनी हा ऐतिहासिक निकाल दिला.
न्यायालयाने हा गुन्हा "दुर्मिळात दुर्मीळ" स्वरूपाचा असल्याचे स्पष्ट करत आरोपीने अल्पवयीन, असहाय्य मुलीवर अत्यंत क्रूरपणे अत्याचार करून तिची हत्या केल्याचे नमूद केले. आरोपीचा गुन्हेगारी पूर्वइतिहास, समाजावर होणारा गंभीर परिणाम आणि गुन्ह्यातील क्रौर्य लक्षात घेऊन फाशीची शिक्षा योग्य असल्याचे न्यायालयाने म्हटले.
निकालावेळी न्यायालयाने निरीक्षण नोंदवताना सांगितले की, पीडिता स्वतःचे संरक्षण करण्याच्या स्थितीत नव्हती. आरोपीने नियोजनपूर्वक अत्याचार करून हत्या केली. शवविच्छेदन अहवाल, सीसीटीव्ही फुटेज, फॉरेन्सिक पुरावे आणि साक्षीदारांच्या आधारे गुन्हा निर्विवादपणे सिद्ध झाला आहे. आरोपीमध्ये सुधारण्याची कोणतीही शक्यता दिसत नसल्याने कठोरातील कठोर शिक्षा आवश्यक असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.
विशेष न्यायालयाने पोलिसांच्या जलद आणि प्रभावी तपासाचे तसेच विशेष सरकारी वकील, डॉक्टर, सायबर तज्ज्ञ आणि फॉरेन्सिक पथकाच्या कामाचेही कौतुक केले. अवघ्या १६ दिवसांत आरोपपत्र दाखल करून तपास पूर्ण करण्यात आल्याचे न्यायालयाने विशेष नमूद केले. या प्रकरणात विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या विविध निकालांचा दाखला देत आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची जोरदार मागणी केली होती. पीडित मुलीच्या कुटुंबीयांनीही आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी न्यायालयाकडे केली होती.
उल्लेखनीय म्हणजे, १ मे २०२६ रोजी नसरापूर येथे घडलेल्या या अमानुष घटनेनंतर राज्यभर संताप व्यक्त झाला होता. पुणे ग्रामीण पोलिसांनी अल्पावधीत तपास पूर्ण करून सुमारे १,२०० पानी आरोपपत्र न्यायालयात सादर केले होते. गुन्हा घडल्यापासून शिक्षेपर्यंतचा प्रवास अवघ्या ५५ दिवसांत पूर्ण झाल्याने हे प्रकरण देशातील सर्वात वेगाने निकाली निघालेल्या गंभीर गुन्ह्यांपैकी एक ठरले आहे.
