सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
बारामती, प्रतिनिधी
एग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या शारदा महिला संघ विभागाच्या वतीने सस्तेवाडी येथील कदम वस्तीमध्ये ‘समृद्ध महिला अभियान’ महिला मेळावा उत्साहात पार पडला. यावेळी एग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या विश्वस्त सुनंदा पवार यांनी महिलांनी बचत गटांच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्याबरोबरच उद्योग-व्यवसाय उभारण्यावर भर द्यावा, असे आवाहन केले.
यावेळी बोलताना सुनंदा पवार म्हणाल्या, “प्रत्येक महिलेकडे एखादी उत्कृष्ट कला असते आणि ती एक उत्तम सुगरण असते. या गुणांना प्राधान्य देत महिलांनी स्वतःचे उद्योग उभारावेत. बचत गट हे महिलांच्या वैयक्तिक व कौटुंबिक सर्वांगीण विकासासाठी प्रभावी माध्यम आहे. बचत गटांच्या माध्यमातून आर्थिक शिस्त राखून उद्योग-व्यवसाय उभारल्यास महिलांचे सक्षमीकरण अधिक प्रभावीपणे होऊ शकते.”
त्या पुढे म्हणाल्या की, महिलांनी तयार केलेल्या उत्पादनांची गुणवत्ता, आकर्षक पॅकेजिंग आणि बाजारपेठेतील स्पर्धा लक्षात घेऊन योग्य दर निश्चित करणे आवश्यक आहे. स्पर्धात्मक बाजारपेठेत टिकून राहण्यासाठी गुणवत्तेला सर्वाधिक महत्त्व द्यावे लागते.
शारदा महिला संघाच्या माध्यमातून केवळ आर्थिक व्यवहारच नव्हे तर महिलांच्या आरोग्यविषयक जनजागृतीसाठी विविध उपक्रम राबविले जातात. तसेच महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी विविध प्रशिक्षण कार्यक्रम, कर्ज सुविधा आणि उद्योग उभारणीसाठी मार्गदर्शन दिले जाते. महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी ‘भीमथडी जत्रा’सारखे व्यासपीठ उभारण्यात आले असून ‘स्वराज गृह उद्योग’च्या माध्यमातून त्यांच्या उत्पादनांच्या विपणनाची जबाबदारीही पार पाडली जात असल्याचे त्यांनी सांगितले. महिलांच्या आरोग्य सुरक्षेसाठी शारदा महिला संघाने सुमारे ३० लाख रुपयांच्या खर्चातून पाच हजार महिलांचा विमा उतरविल्याची माहितीही त्यांनी दिली. वाढत्या कर्करोगाच्या पार्श्वभूमीवर महिलांनी आरोग्याची विशेष काळजी घेऊन नियमित तपासण्या, सोनोग्राफी व आवश्यक वैद्यकीय चाचण्या करून घ्याव्यात, असे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी माजी पंचायत समिती सदस्या मेनका मगर, सुनिता सस्ते, स्वराज उद्योग समूहाचे प्रशांत निंबाळकर उपस्थित होते. तसेच विद्या कदम, स्वप्नाली कदम, उज्वला कारंडे, जया सोळसकर, सायली निकम, सारिका साळुंखे आणि प्राजक्ता यादव यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे नियोजन शारदा महिला संघाचे विभाग प्रमुख बाळासाहेब नगरे, तालुका समन्वयक प्रकाश साळुंखे, गजानन मोकाशी, सुरेंद्र गोरे, सायली निकम, नीलंबरी साळुंखे तसेच जिजाऊ महिला बचत गट, हिरकणी महिला बचत गट आणि परिवार महिला बचत गट यांच्या सहकार्याने करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयाताई सोळसकर यांनी केले, तर वाहतूक व्यवस्थेची जबाबदारी नवनाथ साळुंखे यांनी सांभाळली.
