सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
पुणे, प्रतिनिधी
पुणे, दि. १३ : पुणे शहरातील वाहतूक कोंडी कमी करून नागरिकांना दिलासा देण्यासाठी जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मोटार वाहन कायदा, १९८८ मधील कलम ११५ अन्वये प्राप्त अधिकाराचा वापर करून पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत जड, अवजड व मल्टी अॅक्सल वाहनांच्या प्रवेशावर तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी यांनी जारी केलेल्या आदेशानुसार, दि. १५ जून २०२६ रोजी रात्री १२ वाजल्यापासून ते दि. २४ जून २०२६ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत पुणे शहरातून इतर शहरांकडे जाणाऱ्या जड-अवजड वाहनांना शहरात प्रवेश करता येणार नाही. या कालावधीत संबंधित वाहनांसाठी सोलापूर, मुंबई, अहिल्यानगर, सासवड, चाकण, शिक्रापूर, तळेगाव, जेजुरी आणि सुपे मार्गे पर्यायी मार्ग निश्चित करण्यात आले आहेत.
शहरात माल उतरविणे अथवा माल भरून इतरत्र जाणे आवश्यक असलेल्या वाहनांनी तसेच अत्यावश्यक सेवा पुरविणाऱ्या वाहनांनी वाहतूक शाखा, पुणे शहर यांची ७२ तास अगोदर परवानगी घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. अशा वाहनांना रात्री ११ ते सकाळी ६ या वेळेत निर्धारित पर्यायी मार्गांचा वापर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
दरम्यान, पेट्रोल, डिझेल, दूध, शेतीमाल आणि इतर अत्यावश्यक सेवा पुरविणाऱ्या वाहनांना या बंदी आदेशातून वगळण्यात आले आहे. वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी नागरिकांनी आणि वाहनचालकांनी प्रशासनाने निश्चित केलेल्या पर्यायी मार्गांचा वापर करून सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डूडी यांनी केले आहे.
