सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
बारामती : प्रतिनिधी
बारामती नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्मारक उभारणीच्या प्रस्तावाला एकमताने मंजुरी देण्यात आली. स्मारक परिसरात सुमारे ५० मीटर उंचीचा टॉवर उभारण्यात येणार असून, तो बारामतीतील प्रमुख आकर्षण ठरणार असल्याची माहिती नगराध्यक्ष सचिन सातव यांनी दिली.
मंगळवारी (दि. २३) झालेल्या नगरपरिषदेच्या सभेला उपनगराध्यक्षा श्वेता नाळे, मुख्याधिकारी पंकज भुसे यांच्यासह बहुसंख्य नगरसेवक उपस्थित होते. सभेत स्मारक उभारणीचा विषय मांडण्यात आला आणि त्यास सर्वानुमते मंजुरी देण्यात आली.
स्मारकासाठी प्रशासकीय भवनाशेजारील जागेची निवड करण्यात आली असून, येथे तीन मजली अत्याधुनिक म्युझियम उभारण्याचे नियोजन आहे. या म्युझियममध्ये अजित पवार यांना विविध क्षेत्रांत मिळालेले सन्मान, भेटवस्तू आणि त्यांच्या सार्वजनिक जीवनाशी संबंधित वस्तूंचे प्रदर्शन करण्यात येणार आहे. तसेच त्यांच्या कार्यशैलीचे वैशिष्ट्य असलेल्या ‘जनता दरबार’ची प्रतिकृतीही उभारण्यात येणार आहे.
याशिवाय, अजित पवार यांच्या जन्मापासून ते उपमुख्यमंत्रीपदापर्यंतच्या सार्वजनिक जीवनाचा प्रवास दृकश्राव्य माध्यमातून सादर करण्यात येणार आहे. भावी पिढीला त्यांच्या कार्याची माहिती व प्रेरणा मिळावी, या उद्देशाने हा प्रकल्प साकारण्यात येणार असल्याचे सभेत सांगण्यात आले.
सभेदरम्यान काही नगरसेवकांनी स्मारक परिसरात स्वच्छता कर्मचाऱ्यांसोबतचा अजित पवार यांचा पुतळा उभारण्याची, त्यांच्या नावाने शिष्यवृत्ती सुरू करण्याची तसेच त्यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार देण्याची शिफारस राज्य शासनाकडे करण्याची मागणी केली.
बारामतीकरांच्या भावनांशी निगडित असलेला हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प लवकरात लवकर पूर्णत्वास नेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येतील, अशी ग्वाही नगराध्यक्ष सचिन सातव यांनी यावेळी दिली.
