सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
मुंबई : प्रतिनिधी
राज्यातील खासगी प्रवासी बसमधून कुरिअर पार्सल किंवा अन्य अवैध मालवाहतूक करणाऱ्या बस चालक व मालकांवर आता कडक कारवाई करण्यात येणार आहे. वारंवार नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांचा परवाना निलंबित करण्यासह अखेर रद्द करण्याची कारवाई केली जाईल, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधानसभेत दिली.
विधानसभेतील प्रश्नोत्तराच्या तासात सदस्य शंकर जगताप यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. चर्चेदरम्यान भास्कर जाधव, सुनील प्रभू आणि सिद्धार्थ शितोळे यांनी उपप्रश्न विचारले. यावेळी मंत्री सरनाईक यांनी सांगितले की, राज्यातील खासगी प्रवासी बसांची वायू वेग पथकांमार्फत नियमित तपासणी केली जाते. मात्र, यापुढे वारंवार नियमभंग करणाऱ्या चालक व मालकांवर थेट मोटार वाहन अधिनियम 1988 च्या कलम 86 अंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे.
नवीन नियमानुसार पहिल्या उल्लंघनासाठी 7 ते 10 दिवस, दुसऱ्या उल्लंघनासाठी 10 ते 15 दिवस, तिसऱ्या उल्लंघनासाठी 15 ते 30 दिवस परवाना निलंबित केला जाईल. चौथ्यांदा नियमभंग आढळल्यास संबंधित वाहनाचा परवाना थेट रद्द करण्यात येणार आहे.
परिवहन विभागाने 2025-26 या कालावधीत मालवाहतूक करणाऱ्या खासगी प्रवासी बस संवर्गातील 5,728 दोषी वाहनांवर कारवाई करून 4.61 कोटी रुपयांहून अधिक दंड वसूल केला आहे. तसेच 1 एप्रिल ते 31 मे 2026 या दोन महिन्यांत 1,454 वाहनांवर कारवाई करत 78.18 लाख रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.
याशिवाय राष्ट्रीय महामार्गांवरील पदपथांवर अनधिकृतरीत्या बस थांबवण्याच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी विविध महानगरपालिकांकडून माहिती मागविण्यात आली आहे. भविष्यातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी अधिकृत बसथांबे उभारण्याबाबतही संबंधित महापालिकांना सूचना देण्यात आल्याचे मंत्री सरनाईक यांनी सांगितले.
दरम्यान, राज्य परिवहन महामंडळाकडे सध्या सुमारे 8,300 एसटी बसेस उपलब्ध असून एसटी बसांची कमतरता नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. लोकप्रतिनिधींनी त्यांच्या भागासाठी अतिरिक्त बसांची मागणी केल्यास त्या उपलब्ध करून दिल्या जातील, असेही त्यांनी सांगितले.
