Pune Breaking l प्यार... लव्ह... आणि धोका! प्रेमाच्या शेवटी आला मृत्यूचा खेळ : होणाऱ्या पत्नीने प्रियकराच्या मदतीने काढला काटा

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम----- 
मावळ : प्रतिनिधी 
 मावळ तालुक्यातील ऐतिहासिक लोहगड किल्ल्यावर आढळलेल्या तरुणाच्या मृत्यूच्या प्रकरणाला धक्कादायक वळण मिळाले असून, हा अपघात नसून नियोजित खून असल्याचे तपासात समोर आले आहे. या प्रकरणी मृत तरुणाची होणारी पत्नी आणि तिच्या प्रियकराला पुणे ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे.
18 जून रोजी लोहगड किल्ल्याच्या पश्चिमेकडील भागातील झुडपांमध्ये केतन विशाल अगरवाल (वय 25, रा. गहुंजे, ता. मावळ) याचा मृतदेह आढळून आला होता. त्यावेळी त्याच्यासोबत असलेल्या सिया गोयल हिने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, किल्ला पाहताना केतनचा पाय घसरून तो दरीत पडल्याने मृत्यू झाल्याचे सांगितले होते. त्यानुसार लोणावळा ग्रामीण पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मात्र, घटनेतील काही बाबी संशयास्पद वाटल्याने पुणे ग्रामीण पोलिसांनी सखोल तपास सुरू केला. पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेची विशेष पथके तपासासाठी नियुक्त करण्यात आली.
तपासादरम्यान सिया गोयल हिचे चेतन चौधरी याच्यासोबत प्रेमसंबंध असल्याची माहिती समोर आली. दरम्यान, केतनचे वडील विशाल अगरवाल यांनी दिलेल्या तक्रारीत सिया आणि चेतन यांनी संगनमताने केतनची हत्या केल्याचा आरोप केला.
पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता, उष्णतेच्या वातावरणात हुडी घालून, चेहरा झाकण्याचा प्रयत्न करत आणि कानात हेडफोन लावून फिरणारा एक संशयित तरुण दिसून आला. त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने तपासाची दिशा बदलली.

तांत्रिक पुरावे, सीसीटीव्ही फुटेज आणि चौकशीच्या आधारे पोलिसांनी सिया गोयल व चेतन चौधरी यांना ताब्यात घेतले. प्राथमिक चौकशीत दोघांनी मिळून केतनच्या हत्येचा कट रचल्याचे समोर आल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.

या घटनेमुळे मावळ परिसरात मोठी खळबळ उडाली असून, प्रेमसंबंध, विश्वासघात आणि नियोजित गुन्ह्याचा हा धक्कादायक प्रकार असल्याची चर्चा सुरू आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पुणे ग्रामीण पोलिसांकडून सुरू असून, आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
To Top