सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
पुणे : प्रतिनिधी
पुण्यात पुन्हा एकदा लॉरेन्स बिश्नोई टोळीचे कथित कनेक्शन समोर आले असून, खंडणीसाठी धमकी देत दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने एका उद्योजकावर थेट गोळीबार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणात बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी शुभम लोणकरच्या गटाचा सहभाग असल्याचा प्राथमिक संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
वानवडी येथील अमोल राजेंद्र चमडाई यांनी खंडणीच्या धमकीबाबत पोलिसांकडे तक्रार दाखल केली. दुपारी साडेचारच्या सुमारास स्वतःला "अर्जुन बिश्नोई" असे संबोधणाऱ्या व्यक्तीने फोन करून मोठ्या रकमेची खंडणी मागितल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे. त्यानंतर पुढील कारवाईसाठी त्यांना फुरसुंगी पोलीस ठाण्यात पाठविण्यात आले.
दरम्यान, फिर्यादी पोलीस ठाण्यात असतानाच रात्री सुमारे ८.१० वाजता त्यांच्या एच. व्ही. विकास पाइप्स अँड स्टील प्रा. लि. या आस्थापनावर अज्ञातांनी चार राऊंड गोळीबार केला. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून, फुरसुंगी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २६४/२०२६ दाखल करण्यात आला आहे.
तपासादरम्यान संशयाची सुई शुभम लोणकरकडे वळली आहे. बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणातील तो प्रमुख आरोपी असून, यापूर्वी अकोला पोलिसांनी त्याला अटक करून त्याच्याकडून पाच पिस्तुले जप्त केली होती. तसेच वारजे परिसरातील काही तरुणांच्या माध्यमातून त्याने टोळीचे जाळे उभे केल्याची माहितीही तपासात समोर आली होती.
लोणकर हा अभिनेता Salman Khan याला धमकी देण्याच्या प्रकरणातही आरोपी आहे. सैन्य भरतीसाठी राजस्थानला गेल्यानंतर त्याचा बिश्नोई टोळीशी संपर्क आला आणि त्यानंतर पुण्यात टोळीचे नेटवर्क उभे केल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे. प्राथमिक माहितीनुसार तो सध्या कॅनडामध्ये फरार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
यापूर्वीही पिंपरी-चिंचवडमधील एका फर्निचर मॉलवर झालेल्या गोळीबारात बिश्नोई टोळीचे कथित कनेक्शन समोर आले होते. आता उद्योजकावर झालेल्या या गोळीबारामुळे पुणे शहर व ग्रामीण भागात संघटित गुन्हेगारी टोळ्यांची वाढती घुसखोरी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
दरम्यान, गोळीबार करणाऱ्या संशयितांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विशेष पथके रवाना केली असून, घटनेचा सखोल तपास सुरू आहे.
