सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
लखनऊ : प्रतिनिधी
उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ येथे सोमवारी दि. २२ रोजी दुपारी एका व्यावसायिक इमारतीत लागलेल्या भीषण आगीत किमान १५ विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या दुर्घटनेत अनेक विद्यार्थी जखमी झाले असून काही विद्यार्थी इमारतीत अडकल्याची भीती व्यक्त करण्यात आली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, लखनऊच्या अलीगंज परिसरातील पूर्णिया भागात असलेल्या एका व्यावसायिक इमारतीच्या वरच्या मजल्यांवर कोचिंग संस्था सुरू होती. अचानक आग लागल्यानंतर संपूर्ण इमारतीत धुराचे लोट पसरले आणि विद्यार्थ्यांमध्ये एकच गोंधळ उडाला.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, आग आणि धुरापासून बचाव करण्यासाठी सात ते आठ विद्यार्थ्यांनी थेट इमारतीवरून उड्या मारल्या. अनेक विद्यार्थी खिडक्यांमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न करताना दिसले. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या व बचाव पथके घटनास्थळी दाखल झाली. अग्निशमन दलाने युद्धपातळीवर बचावकार्य राबवत आग आटोक्यात आणण्यासह विद्यार्थ्यांना सुरक्षित बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू केले. उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक यांनी घटनास्थळी भेट देऊन बचावकार्याचा आढावा घेतला. जखमींना तातडीने उपचार उपलब्ध करून देण्याच्या सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या.
दरम्यान, या दुर्घटनेची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अलीगढ व हाथरस येथील नियोजित कार्यक्रम रद्द करून तातडीने लखनऊकडे रवाना होत घटनास्थळी भेट दिली. त्यांनी बचावकार्य वेगाने पूर्ण करण्याचे निर्देश दिले.
केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही या दुर्घटनेबाबत दुःख व्यक्त केले असून ते लखनऊला भेट देणार असल्याची माहिती समोर आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही घटनेबद्दल तीव्र शोक व्यक्त करत मृतांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त केल्या आहेत. तसेच जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी प्रार्थना त्यांनी केली आहे.
या भीषण दुर्घटनेमुळे संपूर्ण देशभरातून हळहळ व्यक्त केली जात असून आगीचे नेमके कारण शोधण्यासाठी चौकशी सुरू करण्यात आली आहे.
