Satara News l बनावट चलनांचा खेळ उघड; जिल्हा परिषदेची २८.५० लाखांची फसवणूक, दोन ठेकेदारांवर गुन्हा

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम----- 
सातारा : प्रतिनिधी 
 जिल्हा परिषद सातारा येथील लघुपाटबंधारे विभागाची तब्बल २८ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी दोन ठेकेदारांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शासकीय कामांच्या निविदा मिळवल्यानंतर शासनाकडे सुरक्षा ठेव म्हणून जमा करावयाच्या रकमेची बनावट बँक चलने सादर केल्याचे तपासात उघड झाले आहे.
या प्रकरणी योगेश रवींद्र बर्गे (रा. शिंदेवाडी, ता. फलटण) आणि विजय बापूसाहेब घाडगे (रा. विक्रांतनगर, संभाजीनगर, सातारा) यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. जिल्हा परिषद लघुपाटबंधारे विभागामार्फत जिल्ह्यातील विविध भागांमध्ये बंधारे, पाझर तलावांची देखभाल-दुरुस्ती तसेच अन्य विकासकामे केली जातात. विभागाचा कारभार सध्या अभियंता अरुणकुमार दिलपाक यांच्या देखरेखीखाली सुरू आहे.
लघुपाटबंधारे विभागाने वरुड (ता. खटाव), स्वरूपखानवाडी (ता. माण), उंबर्डे (ता. खटाव) आणि तोंडले (ता. माण) येथील सहा विकासकामांसाठी निविदा मागवल्या होत्या. कमी दराच्या निविदा सादर करून योगेश बर्गे व विजय घाडगे यांनी ही कामे मिळवली होती.
कामांच्या अटींनुसार शासनाकडे सुरक्षा ठेव रक्कम जमा करण्याच्या सूचना विभागाकडून देण्यात आल्या होत्या. त्यानुसार संबंधित ठेकेदारांनी रक्कम भरल्याच्या पावत्या आणि चलने विभागाकडे सादर केली. मात्र, कागदपत्रांची पडताळणी करताना संबंधित रक्कम प्रत्यक्षात बँकेत जमा झालेली नसल्याचे आढळून आले. तसेच सादर करण्यात आलेली चलने बनावट असल्याचे स्पष्ट झाले.

या प्रकारामुळे शासनाची आणि जिल्हा परिषदेची २८ लाख ५० हजार रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी अभियंता अरुणकुमार दिलपाक यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक पाटोळे पुढील तपास करीत आहेत.
To Top