सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सासवड : प्रतिनिधी
पुणे ग्रामीण पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) सोमवारी मोठी कारवाई करत अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये फरार असलेल्या दिगंबर उर्फ दिग्या दशरथ शेडकर (वय २८) याला सासवड येथून अटक केली. खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, खंडणी, आर्म ॲक्ट तसेच मोक्का अंतर्गत गुन्ह्यांसह एकूण १५ गंभीर गुन्ह्यांमध्ये तो वाँटेड होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिगंबर शेडकर याच्याविरोधात शिरूर, सासवड, जेजुरी आणि राजगड पोलीस ठाण्यांत अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. ३ ऑक्टोबर २०२५ रोजी ट्रान्सफॉर्मर बंद केला नाही या कारणावरून त्याने एका व्यक्तीला मारहाण केली होती. त्यानंतर ९ मार्च २०२६ रोजी सोनोरी येथील एका हॉटेल चालकाला धमकावून ३२ हजार रुपयांची लूट केली होती. यापूर्वी त्याच्याकडून अडीच लाख रुपयांची खंडणी उकळल्याचाही आरोप आहे.
तसेच १९ मार्च २०२६ रोजी मांडवगण फराटा येथे क्रिकेट मैदानावर बॅनर लावण्याच्या कारणावरून झालेल्या वादात त्याने पिस्तूल काढून गोळीबार केला होता. या घटनेनंतर तो फरार झाला होता.
दिगंबर हा अत्यंत चलाख गुन्हेगार असून पोलिसांना चकवा देण्यासाठी तो सतत वेशांतर करत होता. तसेच वारंवार राहण्याची ठिकाणे बदलत असल्याने त्याचा शोध घेणे पोलिसांसाठी आव्हानात्मक ठरत होते. अवैध शस्त्र बाळगणाऱ्या टोळ्यांशी त्याचे संबंध असल्याची माहिती मिळाल्यानंतर पुणे ग्रामीण एटीएस त्याच्या मागावर होते.
पोलीस अधीक्षक संदिपसिंह गिल यांच्या मार्गदर्शनाखाली एटीएसच्या पथकाने सापळा रचून त्याला सासवड परिसरातून जेरबंद केले. सध्या तो फरारी अवस्थेत कोणाच्या मदतीने राहत होता, तसेच त्याचे आणखी कोणाशी संबंध आहेत का, याचा सखोल तपास सुरू आहे.
ही कारवाई पुणे ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक संदिपसिंह गिल, पुणे विभागाचे अपर पोलीस अधीक्षक डॉ. शुभम कुमार आणि बारामती विभागाचे अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. एटीएसचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्ताजीराव मोहिते, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक महेश गायकवाड, निलेश कदम, विशाल गव्हाणे तसेच पोलीस अंमलदार मोसीन शेख आणि ओंकार शिंदे यांच्या पथकाने ही यशस्वी कारवाई केली.
