सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
लोणंद : पांडुरंग कुंभार
संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यानिमित्त तरडगाव येथील चांदोबाचा लिंब परिसरात माऊलींच्या उभ्या रिंगणाच्या ठिकाणी दिंडींना दानवाटप तसेच ‘कला भूषण’ पुरस्कार वितरण सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. वारकरी संप्रदायातील भक्ती, संस्कार, कला-साधना आणि समाजसेवेचा संदेश देणारा हा सोहळा भाविकांसाठी प्रेरणादायी ठरला.
या कार्यक्रमाचे शिल्पकार ह.भ.प. सुरेश विठ्ठल जाधव (चोपदार), ह.भ.प. शंकरराव मर्दाने आणि ह.भ.प. गजेंद्र मुसळे होते. कार्यक्रमासाठी चोपदार फाऊंडेशन आळंदी, महानुभाव आश्रम तरडगाव आणि दुर्गामाता फाऊंडेशन तरडगाव यांचे मोलाचे सहकार्य लाभले. कार्यक्रमास ह.भ.प. बाळासाहेब रणदीवे (प्रमुख चोपदार, पालखी सोहळा), ह.भ.प. लक्ष्मण मेंगडे महाराज (बंकटस्वामी मठ, पंढरपूर), ह.भ.प. सोपानकाका महाराज टेंभूकर, ह.भ.प. दिनकर पाटील कोरलीकर, ह.भ.प. पांडुरंग महाराज देशमुख, ह.भ.प. बाळकृष्ण महाराज यादव, महंत श्री राजधरव्यासबाबा राहेरकर आणि महंत श्री प्रमोददादा राहेरकर यांच्यासह अनेक संत-महंत, कीर्तनकार, दिंडीप्रमुख व वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
समारंभात बोलताना महंत श्री प्रमोददादा राहेरकर यांनी संत परंपरेचा वारसा जपत अध्यात्म, संस्कार, ज्ञान आणि समाजसेवा यांचा प्रसार करण्याचे महत्त्व अधोरेखित केले. अध्यक्षस्थानावरून मार्गदर्शन करताना ह.भ.प. बाळासाहेब रणदीवे यांनी संत ज्ञानेश्वर माऊलींच्या विचारांचा वारसा जतन करण्याचे आवाहन केले. वारकरी संप्रदाय हा केवळ भक्तीचा नव्हे, तर संस्कार, समाजप्रबोधन आणि मानवतेचा मार्ग असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी वारकरी संप्रदायातील भजन, कीर्तन, गायन, तबला आणि मृदुंग वादन क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गुणवंत बालकलावंतांचा ‘कला भूषण’ पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. यामध्ये कु. अर्पिता सुरज कुंभार, चि. साईराज विठ्ठल मोहिते, चि. आदित्य सूर्यकांत यादव, चि. सौरभ बापूराव जाधव, चि. शिवराज विनोद कुंडलकर, चि. कृष्णा राजेंद्र कांरडे, चि. साईराज प्रविण होवाळ, चि. सिद्धेश नवनाथ अडसुळ आणि चि. कार्तिक किशोर ननावरे यांचा समावेश होता.
तसेच श्री कृष्णादेव तुकाराम लोहार यांना ‘आदर्श चोपदार पुरस्कार’ आणि ‘उत्कृष्ट मृदुंगमणी पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. महानुभाव आश्रम ब्रह्मविद्या पाठशाळा, तरडगाव यांच्या वतीने महंत श्री राजधरव्यासबाबा राहेरकर यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ह.भ.प. अॅड. गजेंद्र मुसळे यांनी केले, तर आभार प्रदर्शन ह.भ.प. झगडे महाराज यांनी मानले. वारकरी परंपरेतील कलावंतांचा गौरव करणारा आणि संत विचारांची प्रेरणा देणारा हा उपक्रम उपस्थितांच्या स्मरणात राहणारा ठरला.
