सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
बारामती : प्रतिनिधी
बारामती तालुक्यात काँग्रेस पक्षाची संघटनात्मक ताकद वाढवण्यासाठी महत्त्वपूर्ण नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. बारामती शहर काँग्रेसच्या शहराध्यक्षपदी वीरधवल गाडे, तर तालुका काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी वैभव बुरुंगले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशानुसार या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या 'संघटन सुजन अभियाना' अंतर्गत निरीक्षकांनी बारामतीला भेट देऊन स्थानिक नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी चर्चा केली होती. त्यानंतर सादर करण्यात आलेल्या अहवाल व शिफारशींचा विचार करून या नियुक्त्यांवर अंतिम शिक्कामोर्तब करण्यात आले.
नियुक्तीनंतर बोलताना वीरधवल गाडे आणि वैभव बुरुंगले यांनी भाजप सरकारवर टीका करत, राज्य व देशातील भ्रष्टाचार, बेरोजगारी, शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांवर काँग्रेस रस्त्यावर उतरून संघर्ष करणार असल्याचे सांगितले. भाजप सरकारच्या धोरणांविरोधात जनजागृती करत पक्षाची भूमिका प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
युवक, शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांवर प्रभावीपणे आवाज उठवत आगामी काळात काँग्रेसचे संघटन अधिक मजबूत करण्यासाठी काम करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, खासदार राहुल गांधी यांचे हात बळकट करण्यासाठी आणि बारामती तालुक्यात काँग्रेसचा विस्तार करण्यासाठी पूर्ण ताकदीने काम करण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला.
या नियुक्तीबद्दल दोन्ही पदाधिकाऱ्यांनी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचे आभार मानले. तसेच आमदार विश्वजीत कदम, आमदार सतेज उर्फ बंटी पाटील, जिल्हाध्यक्ष लहू निवंगुने, युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष उमेश पवार, प्रदेश सचिव आकाश मोरे आणि ज्येष्ठ नेते अशोक इंगुले यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती तालुक्यात काँग्रेसचे संघटन अधिक बळकट करण्यासाठी काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
