सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
पुणे : प्रतिनिधी
श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यानिमित्त पुणे ग्रामीण हद्दीतील पालखी मार्गावर वाहतुकीत तात्पुरते बदल करण्यात आले असून, नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले आहे.
श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे ८ जुलै २०२६ रोजी श्रीक्षेत्र आळंदी येथून प्रस्थान होणार आहे. पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर ११ ते १५ जुलै या कालावधीत ग्रामीण हद्दीत कडक बंदोबस्त ठेवण्यात येणार असून, वाहतुकीचे नियोजन सुरळीत ठेवण्यासाठी विविध मार्गांवरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत.
११ ते १३ जुलै : पुणे – सासवड मार्ग बंद
११ जुलै रोजी पहाटे २ वाजल्यापासून १३ जुलै रोजी रात्री १२ वाजेपर्यंत पुणेकडून सासवडकडे दिवेघाट व बोपदेव घाटमार्गे जाणारी सर्व वाहतूक पूर्णपणे बंद राहील. या मार्गावरील वाहने खडी मशीन चौक – कात्रज – कापूरहोळ मार्गे वळविण्यात येतील. तर सासवडकडून पुण्याकडे येणारी वाहतूक गराडे – खेड – शिवापूर मार्गे सोडण्यात येईल.
१३ ते १४ जुलै : सासवड – जेजुरी – वाल्हे मार्गावर बदल
१३ जुलै पहाटे २ वाजल्यापासून १४ जुलै रात्री १२ वाजेपर्यंत पुणे–सासवड–जेजुरी–वाल्हे–निरा तसेच निरा–पुणे या मार्गावरील वाहतुकीसाठी झेंडेवाडी – पारगाव मेमाणे – सुपे – मोरगाव – निरा हा पर्यायी मार्ग वापरण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
१५ जुलै : वाल्हे – लोणंद टप्पा
१५ जुलै रोजी पहाटे २ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत पुणे–सासवड–जेजुरी–वाल्हे–निरा तसेच निरा–पुणे या मार्गावरील वाहनांनी सासवड – जेजुरी – मोरगाव या पर्यायी मार्गाचा वापर करावा.
१५ ते १८ जुलै : लोणंद – फलटण मार्गावरील वाहतूक
१५ ते १८ जुलै या कालावधीत लोणंद व फलटण येथून पुण्याकडे येणारी तसेच पुण्यावरून लोणंद व फलटणकडे जाणारी वाहतूक शिरवळ मार्गे वळविण्यात आली आहे.
पालखी सोहळ्यादरम्यान नागरिकांनी प्रशासनाने निश्चित केलेल्या पर्यायी मार्गांचा वापर करून सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले आहे.
