Pandharpur Breaking | वटपौर्णिमेलाच काळाचा घाला; पतीला वाचवताना पत्नीचाही विजेच्या धक्क्याने मृत्यू

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम----- 
पंढरपूर : प्रतिनिधी 
 वटपौर्णिमेच्या पवित्र दिवशी पतीच्या दीर्घायुष्यासाठी उपास आणि वडाची पूजा करण्याची तयारी सुरू असतानाच पंढरपूर तालुक्यातील आंबे गावात हृदयद्रावक घटना घडली. शेतातील पाण्याच्या पंपाची वीज बंद करण्यासाठी गेलेल्या पतीला विजेचा धक्का बसल्यानंतर त्याला वाचवण्यासाठी धावलेल्या पत्नीचाही करंट लागून जागीच मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.
मृत दाम्पत्याची नावे लक्ष्मण बाबू नागणे (वय ६०) आणि अलका लक्ष्मण नागणे (वय ५५) अशी आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी पहाटे पावसाच्या वातावरणात नागणे दाम्पत्य नेहमीप्रमाणे शेतातील कामासाठी गेले होते. पहाटे सुमारे ५ वाजण्याच्या सुमारास शेतातील पाण्याच्या पंपाची वीज बंद करण्यासाठी लक्ष्मण नागणे विहिरीजवळ गेले. मोटार बंद करत असताना त्यांना अचानक विजेचा तीव्र धक्का बसला आणि ते विद्युतप्रवाहात अडकले.
पतीला मृत्यूशी झुंज देताना पाहताच अलका नागणे यांनी कोणताही विचार न करता त्यांना वाचवण्यासाठी धाव घेतली. मात्र, विजेचा प्रवाह इतका तीव्र होता की त्यांनाही करंट लागला आणि या दुर्घटनेत दोघांचाही जागीच मृत्यू झाला.
वटपौर्णिमेच्या दिवशी पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करण्याची तयारी करणाऱ्या पत्नीचाच पतीसोबत दुर्दैवी अंत झाल्याने नागणे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेची माहिती मिळताच आंबे गावासह संपूर्ण पंढरपूर तालुक्यात हळहळ व्यक्त करण्यात येत असून, एकाच वेळी पती-पत्नीची अंत्ययात्रा निघणार असल्याने परिसरात शोकमय वातावरण निर्माण झाले आहे.
To Top