सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सुपे : दिपक जाधव
पुणे जिल्ह्यातील ११९६ ग्रामपंचायत हद्दीत विविध शासकीय विभागांच्या योजनांची माहिती ग्रामस्थांपर्यंत पोहचत असलेल्या ग्राम सुरक्षा यंत्रणेचा टोल फ्री नंबर यापुढे निधी अभावी बंद होणार आहे.
ग्राम सुरक्षा यंत्रणेच्या माध्यमातून घटना, दुर्घटनांमध्ये सर्व गावाला एकाच वेळी सूचना देण्यासाठी ग्राम सुरक्षा यंत्रणेच्या टोलफ्री १८००२७०३६०० या नंबरवर केलेला कॉल गावातील सर्व नागरिकांच्या मोबाईलवर तत्काळ प्रसारित होत होता. तसेच ग्रामीण पोलीस दलाचा उपक्रम म्हणून सन २०१९ फेब्रुवारीला ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली होती. जिल्ह्यातील गावांना सदर यंत्रणेचा मोठ्या प्रमाणात फायदा झाला आहे.
मात्र ग्राम सुरक्षा यंत्रणा अविरत सुरु ठेवण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडे वारंवार निधीसाठी पाठपुरावा करण्यात येत होता.
मात्र आवश्यक निधीची तरतूद ग्रापंचायातींकडून झाली नाही. तसेच त्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाकडून कोणतेही प्रयत्न होत नसल्याने ग्राम सुरक्षा यंत्रणेच्या टोल फ्री नंबर ( १८००२७०३६०० ) ची सेवा ५ जुलै पासून जिल्ह्यात पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय ग्राम सुरक्षा यंत्रणेच्या व्यवस्थापनाकडून घेण्यात आला असल्याची माहिती ग्राम सुरक्षा यंत्रणेचे संचालक डी. के. गोर्डे पाटील यांनी दिली.
