सुपे परगणा | काळखैरेवाडीतील शेळ्या चोरीचा उलगडा; सुपे पोलिसांकडून ३५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

सोमेश्वर रिपोर्टर live

सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सुपे : दिपक जाधव
बारामती तालुक्यातील काळखैरेवाडी हद्दीतुन चोरीस गेलेल्या शेळ्या, करड आणि बोकड असा ३५ हजार किंमतीचा मुद्देमाल सुपे पोलिसांनी काही दिवसात शोध घेवुन हस्तगत केल्याने पोलिसांच्या या तत्पर कारवाईचे कौतुक करण्यात येत आहे.
रामचंद्र यदु शेंडगे ( वय ५० ) यांनी यासंदर्भात पोलीस स्टेशनला फिर्याद दिली होती.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, काळखैरेवाडी हद्दीतील बकरी पालनाचा व्यवसाय करणारे शेंडगे यांनी शेतात वाघर लावून शेळ्या, करड आणि बोकड कुलूप बंद असलेल्या जाळीत कोंडली होती. मात्र दुपारच्या वेळी कोणी नसल्याचा फायदा घेत जाळीतील करड, शेळ्या आणि बोकड अज्ञात चोरट्यानी चोरून पोबारा केला.
त्यानंतर बकरी चारून शेतातील वाघरीकडे आली असता चोरी झाल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर पोलिसांनी शेंडगे यांच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला. या घडलेल्या घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तपासाची चक्रे तातडीने फिरवली.
यावेळी पोलिसांनी एक पथक तयार केले होते. त्यानुसार गोपनीय बातमीदारांकडून माहिती घेत तांत्रिक विश्लेषण व प्राप्त माहितीच्या आधारे आरोपीचा शोध घेण्यात आला. या तपासादरम्यान सौरव संजय सूर्यवंशी ( वय २४ रा. शिंदे वस्ती, लोणी भापकर ) यास संशयित म्हणून ताब्यात घेतले. यावेळी त्याने चोरीचा गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यानुसार आरोपीकडून चार करडे, दोन शेळ्या व एक बोकड असा एकूण अंदाजे ३५ हजार किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यावेळी फिर्यादीने ओळख पटवून दिल्याने मुद्देमाल ताब्यात देण्यात आला.
यासंदर्भात जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड आणि प्रभारी पोलीस निरीक्षक प्रकाश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे ग्रामीण पथकाचे पोलीस अंमलदार किसन ताडगे, महादेव साळुंखे, सोमनाथ होले, भाऊ चौधरी आदीच्या पथकाने कारवाई केली. अधिक तपास पोलीस हवालदार रुपेश साळुंखे करीत आहे.
......................................
To Top