सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सातारा, प्रतिनिधी
सातारा, दि. ३ : पुणे येथे विषारी दारूमुळे घडलेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यात अवैध हातभट्टी दारू, ताडी निर्मिती, वाहतूक व विक्रीविरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागाने विशेष मोहीम राबविली असून, केवळ पाच दिवसांत 42 गुन्हे दाखल करत 34 आरोपींना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत सुमारे अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
मा. आयुक्त राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य, मुंबई डॉ. राजेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सहआयुक्त (अंमलबजावणी व दक्षता) प्रसाद सुर्वे, विभागीय उपआयुक्त (कोल्हापूर विभाग) विजय चिचांळकर आणि अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क, सातारा बाबासाहेब भुतकर यांच्या आदेशानुसार 29 मे ते 2 जून 2026 या कालावधीत ही विशेष मोहीम राबविण्यात आली.
या मोहिमेसाठी पाच स्वतंत्र पथके तयार करण्यात आली असून जिल्हाभर धडक कारवाया करण्यात आल्या. कारवाईदरम्यान 451 लिटर हातभट्टी दारू, 853 लिटर ताडी तसेच 71.64 बल्क लिटर देशी-विदेशी मद्य जप्त करण्यात आले. जप्त मुद्देमालाची एकूण किंमत 2 लाख 48 हजार 785 रुपये इतकी आहे. अवैध मार्गाने तयार करण्यात येणारी हातभट्टी दारू, बनावट ताडी व इतर मद्यप्रकार नागरिकांच्या आरोग्यास आणि जीवितास गंभीर धोका निर्माण करू शकतात. राज्यातील काही ठिकाणी घडलेल्या दुर्दैवी घटनांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी अशा अवैध मद्याचे सेवन टाळावे, असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क विभागाने केले आहे.
तसेच सातारा जिल्ह्यात कुठेही अवैध मद्यनिर्मिती, वाहतूक अथवा विक्री होत असल्याचे आढळल्यास नागरिकांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या टोल फ्री क्रमांक 18002339999 किंवा व्हॉट्सअॅप क्रमांक 8422001133 वर संपर्क साधून तक्रार नोंदवावी. तक्रारदाराची ओळख गोपनीय ठेवली जाईल, अशी माहिती अधीक्षक बाबासाहेब भुतकर यांनी दिली.
अवैध मद्यव्यवसायाविरोधातील ही विशेष मोहीम पुढील काळातही सुरू राहणार असून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाने स्पष्ट केले आहे.
