सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
इंदापूर : संतोष माने
इंदापूर उजनी धरणातील पाणीसाठा दिवसेंदिवस कमी होत असतानाही मुख्य कालवा आणि टनेलद्वारे पाणी सोडले जात असल्याने इंदापूर तालुक्यातील पाणलोट क्षेत्रातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. उजनी धरणग्रस्त बचाव कृती समितीचे अध्यक्ष अरविंद जगताप यांनी तालुक्याच्या हक्काच्या पाण्यासाठी पुढील काळात तीव्र संघर्ष उभारण्याचा इशारा दिला आहे.
सध्या उजनी धरणाची पाणीपातळी वजा २२.२० टक्क्यांवर आली असतानाही मुख्य कालव्यातून १,३९९ क्युसेक आणि टनेलमधून १७० क्युसेक पाणी सोडले जात असल्याचा दावा जगताप यांनी केला. इंदापूर तालुक्याच्या गरजांचा विचार न करता पाणी सोलापूर जिल्ह्याकडे वळवले जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
तालुक्याच्या हक्काचे पाणी आरक्षित ठेवून उर्वरित पाणी सोलापूरला देण्यास आमची हरकत नाही. मात्र ‘समनियोजन’ तत्त्वानुसार पाण्याचे वाटप होत नसताना पिण्याच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर पाणी सोडले जात आहे. हे पाणी शेतीसाठी वापरले जात असल्याने इंदापूरच्या शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे, असे जगताप म्हणाले.
उजनीच्या पाणलोट क्षेत्राची पाहणी केल्यानंतर दररोज पाण्याची पातळी घटत असल्याचे दिसून येत असल्याचे त्यांनी सांगितले. भुईमूग, पडवळ यांसारखी गाळपिके, ऊस पीक तसेच अनेक गावांच्या पाणीपुरवठा योजना धोक्यात आल्याची चिंता त्यांनी व्यक्त केली.
दरम्यान, उजनी धरणग्रस्त बचाव कृती समितीच्या वतीने हक्काच्या पाण्यासाठी सातत्याने लढा दिला जात असला तरी राजकीय हस्तक्षेप आणि स्थानिक नेतृत्वाच्या कमकुवत भूमिकेमुळे इंदापूर तालुक्याला न्याय मिळत नसल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली. उजनी धरणासाठी आपल्या वडिलोपार्जित जमिनी दिल्यानंतर अनेक कुटुंबे भूमिहीन झाली. मात्र उर्वरित शेतीसाठीही हक्काचे पाणी मिळत नसेल तर धरणाचा काय उपयोग, असा सवाल धरणग्रस्त शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे.
“धरण उशाला... आणि कोरड घशाला...” अशी परिस्थिती निर्माण झाल्याची संतप्त प्रतिक्रिया शेतकरी व्यक्त करत असून, येत्या काळात पाण्याच्या प्रश्नावर आंदोलनाची धार आणखी तीव्र होण्याची चिन्हे आहेत.
