सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
पुरंदर, प्रतिनिधी
आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर वारकरी संप्रदायाचे श्रद्धास्थान असलेल्या संत सोपानदेव महाराजांच्या पालखी सोहळ्याचे १२ जुलै रोजी सासवड येथून पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे. संत सोपानदेव देवस्थानच्या वतीने पालखी सोहळ्याच्या तयारीला वेग आला असून, यंदा हजारो वारकरी आणि भाविक या सोहळ्यात सहभागी होणार असल्याची माहिती पालखी सोहळा प्रमुख अॅड. त्रिगुण महाराज गोसावी यांनी दिली.
आषाढी वारीनिमित्त ७ जुलै रोजी देहू येथून संत तुकाराम महाराज पालखी सोहळा, तर ८ जुलै रोजी आळंदी येथून संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे प्रस्थान होणार आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी ११ जुलै रोजी सासवड येथे दाखल झाल्यानंतर त्यांच्या धाकट्या बंधू संत सोपानदेव महाराजांची पालखी १२ जुलै रोजी सकाळी ११ वाजता मंदिराच्या देऊळवाड्यातून पंढरपूरकडे मार्गस्थ होईल.
टाळ-मृदुंगाच्या गजरात आणि विठ्ठलनामाच्या जयघोषात पालखीचे प्रस्थान होणार आहे. पहिल्या दिवशी पिंपळे येथे दुपारचा विसावा तर पांगारे येथे रात्रीचा मुक्काम असेल. त्यानंतर पालखी बारामती, इंदापूर, अकलूज मार्गे विविध गावांतून पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. यात्रेदरम्यान वारकऱ्यांसाठी विविध ठिकाणी विसावे, नैवेद्य, रिंगण सोहळे तसेच स्वागत कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. बारामती तालुक्यातील वाघळवाडी येथे १५ जुलै रोजी पहिले गोल रिंगण, तर १८ जुलै रोजी पिंपळी येथे पहिले बकरी रिंगण पार पडणार आहे.
दरम्यान, आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर येथील विकासकामांनाही गती देण्यात आली आहे. श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर जतन व संवर्धन आराखड्याअंतर्गत पडसाळ, देणगी कक्ष, अर्धमंडपातील पायऱ्या यांची कामे २५ जूनपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी S. Kartikeyan यांनी दिल्या आहेत. तसेच पश्चिमद्वाराचे काम तातडीने पूर्ण करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. यावेळी त्यांनी रिद्धी-सिद्धी दर्शन मंडप, चंद्रभागा वाळवंट, सीसीटीव्ही नियंत्रण कक्ष, वाखरी पालखीतळ तसेच वाखरी ते पंढरपूर महामार्गाची पाहणी केली.
पालखी सोहळ्यातील प्रमुख टप्पे-
१२ जुलै : सासवड येथून पालखी प्रस्थान
१५ जुलै : वाघळवाडी येथे पहिले गोल रिंगण
१८ जुलै : पिंपळी येथे पहिले बकरी रिंगण
२२ जुलै : टप्पा येथे बंधूभेट सोहळा
२३ जुलै : वाखरी येथे उभे रिंगण व पालखी भेटी
२४ जुलै : पंढरपूर येथे पालखी आगमन
