सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
वाई : प्रतिनिधी
वाई पोटाची खळगी भरण्यासाठी गावोगावी फिरून खेळाचे सादरीकरण करणाऱ्या समाजातील एका १० वर्षीय चिमुरडीचा विनयभंग झाल्याची संतापजनक घटना वाई शहरातील प्रसिद्ध गणपती घाट परिसरात घडली आहे. पीडित मुलीच्या वडिलांनी दाखवलेल्या धाडसामुळे आरोपीला रंगेहाथ पकडण्यात यश आले असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
राहुल वसंत पवार (वय २२, रा. सिद्धनाथवाडी, ता. वाई) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार कुटुंब मूळचे रापली वडगाव, ता. चांदवड, जि. नाशिक येथील असून खेळाच्या निमित्ताने ते १ जून रोजी वाई शहरात आले होते. त्यावेळी गणपती घाट परिसरात मुक्काम असताना आरोपी राहुल पवार याने १० वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याचा आरोप आहे.
घटना घडताच पीडित मुलीने आरडाओरडा केला. त्यामुळे तिचे पालक जागे झाले. मुलीच्या वडिलांनी प्रसंगावधान राखत आरोपीचा पाठलाग करून त्याला पकडले. मध्यरात्री झालेल्या या गोंधळामुळे परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने घटनास्थळी जमा झाले.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत आरोपीला ताब्यात घेतले. याप्रकरणी संबंधित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत. या घटनेमुळे वाई परिसरात संतापाची लाट उसळली असून बालकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
