सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
दौंड : प्रतिनिधी
दौंड नगरपरिषद कार्यालयात कार्यरत असलेल्या एका महिला अधिकाऱ्याशी अश्लील वर्तन करून विनयभंग केल्याप्रकरणी एका व्यक्तीविरुद्ध दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे नगरपरिषद परिसरात खळबळ उडाली असून कर्मचाऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या दौंड नगरपरिषदेत महिला अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. आरोपी गब्बर वाल्मीकी (रा. दौंड) याने २२ जून रोजी दुपारी सुमारे दोन वाजण्याच्या सुमारास नगरपरिषद कार्यालयात येऊन महिला अधिकाऱ्यांच्या सहकाऱ्यांच्या केबीनबाहेर उभे राहून अश्लील शिवीगाळ केली. तसेच आक्षेपार्ह हावभाव करून महिला अधिकाऱ्यांच्या मनात लज्जा निर्माण होईल, असे कृत्य केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
यावेळी आरोपीने महिला अधिकाऱ्यांना धमकावून त्यांच्या शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
महिला अधिकाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीवरून दौंड पोलीस ठाण्यात संबंधित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हवालदार शेख करीत आहेत.
दरम्यान, शासकीय कार्यालयात महिला अधिकाऱ्याशी अशा प्रकारची घटना घडल्याने नगरपरिषदेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणीही होत आहे.
