सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
पुणे : प्रतिनिधी
पुणे जिल्ह्यातील प्रशासन अधिक प्रभावी, गतिमान आणि नागरिकाभिमुख करण्याच्या उद्देशाने बारामती येथे स्वतंत्र अपर जिल्हाधिकारी कार्यालय सुरू करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन असून या प्रस्तावाबाबत नागरिकांच्या हरकती व सूचना ८ जुलै २०२६ पर्यंत सादर करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले आहे.
महसूल व वन विभागाच्या आदेशानुसार बारामती येथे प्रस्तावित अपर जिल्हाधिकारी कार्यालय स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात बारामती, इंदापूर आणि दौंड या तीन महत्त्वाच्या तालुक्यांचा समावेश करण्यात येणार आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांना विविध प्रशासकीय व महसुली कामांसाठी पुण्यापर्यंत वारंवार प्रवास करण्याची गरज कमी होणार असून स्थानिक स्तरावरच अनेक सेवा उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे.
सध्या पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात पुणे शहरासह आंबेगाव, खेड, मावळ, मुळशी, हवेली, शिरूर, पुरंदर, जुन्नर, भोर आणि राजगड या तालुक्यांचा समावेश आहे. पुणे जिल्ह्यात एकूण १४ तालुके असून वाढत्या प्रशासकीय कामकाजाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना अधिक सुलभ सेवा देण्यासाठी हा बदल प्रस्तावित करण्यात आला आहे.
राज्य शासनाने या प्रस्तावावर अंतिम निर्णय घेण्यापूर्वी नागरिकांची मते जाणून घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे संबंधित तालुक्यांतील नागरिक, लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था, विविध संघटना आणि अन्य संबंधित घटकांनी आपली मते, सूचना किंवा हरकती लेखी स्वरूपात जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर कराव्यात, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
बारामती येथे अपर जिल्हाधिकारी कार्यालय सुरू झाल्यास प्रशासकीय सेवा स्थानिक पातळीवर उपलब्ध होतील, निर्णय प्रक्रियेला गती मिळेल तसेच नागरिकांचा वेळ आणि खर्च वाचण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. आता या प्रस्तावावर नागरिकांकडून कोणत्या सूचना आणि हरकती येतात, याकडे बारामती, इंदापूर आणि दौंड तालुक्यांसह संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
