Phaltan Breaking l फलटणच्या तरुणाच्या सुसाईड नोटमुळे खळबळ; संस्थाचालकाविरुद्ध गुन्हा, तीन दिवस उलटूनही अटक नाही

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
फलटण : प्रतिनिधी 
फुरसुंगी येथील एका खुले निवारागृहात कार्यरत असलेल्या २६ वर्षीय कर्मचाऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली असून, मृत कर्मचाऱ्याने लिहून ठेवलेल्या कथित सुसाईड नोटमधील मजकुराच्या आधारे संस्थाचालकावर मानसिक छळ, धमकावणे आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत. दरम्यान, घटनेला तीन दिवस उलटूनही आरोपीला अटक न झाल्याने नातेवाईक व नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फलटण तालुक्यातील वडले येथील रहिवासी अतुल अंकुश लाळगे (वय २६) हे गेल्या अडीच वर्षांपासून फुरसुंगी येथील श्री साई सेवाभावी संस्था संचालित खुले निवारागृहात कार्यरत होते. २२ जून रोजी दुपारी त्यांनी कामाच्या ठिकाणी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले. त्यांना उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र डॉक्टरांनी त्यांना दाखलपूर्व मृत घोषित केले. शवविच्छेदन अहवालात मृत्यूचे कारण "डेथ ड्यू टू हँगिंग" असे नमूद करण्यात आल्याची माहिती नातेवाईकांनी दिली.
याप्रकरणी मृताचा चुलत भाऊ अनिकेत लहुदास लाळगे यांनी फुरसुंगी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, अतुल लाळगे यांनी लिहून ठेवलेल्या कथित सुसाईड नोटमध्ये संस्थाचालक बालाजी मुस्कवाड यांच्याकडून सातत्याने मानसिक त्रास दिला जात असल्याचा उल्लेख केला आहे. कमी पगारात जास्त काम करून घेणे, संस्थेत आवश्यक कर्मचारी संख्या नसतानाही अनेक जबाबदाऱ्या एकट्यावर टाकणे, संस्थेतील घडणाऱ्या घटनांची जबाबदारी त्यांच्यावर ढकलणे, नोकरी सोडण्याचा प्रयत्न केल्यास करिअर उद्ध्वस्त करण्याची धमकी देणे तसेच वारंवार शिवीगाळ करून मानसिक छळ करणे, असे आरोप नोटमध्ये करण्यात आल्याचा दावा फिर्यादीत करण्यात आला आहे.
तक्रारीनुसार, अतुल लाळगे यांना सोशल वर्कर म्हणून नियुक्त करण्यात आले होते. मात्र त्यांना त्यांच्या पात्रतेबाहेरील समन्वयकाची जबाबदारी देण्यात आली. संस्थेतील बालकांचे संगोपन, कार्यालयीन कामे, विविध नोंदवही, इतर संस्थांची कागदपत्रे, वैयक्तिक कामे, घरगुती कामे, डबे पोहोचविणे, असाइनमेंटची कामे अशा विविध जबाबदाऱ्या त्यांच्यावर टाकण्यात आल्याचा आरोप आहे. तसेच संस्थेमध्ये घडणाऱ्या विविध घटनांसाठी, बालके पळून जाण्याच्या प्रकारांसाठी किंवा इतर कर्मचाऱ्यांच्या चुकांसाठीही अतुल यांनाच जबाबदार धरले जात असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी संस्थेतील एका बालकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानंतरही त्याची जबाबदारी अतुल यांच्यावर टाकून त्यांना मानसिक त्रास देण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे.

कथित सुसाईड नोटमध्ये संस्थेमधील काही गंभीर गैरप्रकार, बालकांच्या संगोपनासंदर्भातील बाबी तसेच आर्थिक व प्रशासकीय व्यवहारांची चौकशी व्हावी, अशी मागणीही करण्यात आल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे. संस्थेमध्ये आवश्यक कर्मचारी नसताना कामकाज चालविणे, नोंदवहींमध्ये कथित चुकीच्या नोंदी करणे, वेळेवर वेतन न देणे आणि विविध प्रशासकीय त्रुटींबाबतही नोटमध्ये उल्लेख असल्याचा दावा करण्यात आला आहे. याशिवाय, संस्थेतील कामकाज किंवा कथित गैरप्रकारांबाबत कुणालाही माहिती दिल्यास अथवा त्याविषयी बोलल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल केले जातील, अशा प्रकारच्या धमक्या वारंवार दिल्या जात असल्याचा उल्लेखही सुसाईड नोटमध्ये असल्याचे फिर्यादीचे म्हणणे आहे.

दरम्यान, आत्महत्येपूर्वी अतुल यांनी आपल्या बहिणीसह कुटुंबीयांकडे कामाच्या ठिकाणी होणाऱ्या त्रासाबाबत नाराजी व्यक्त केली होती, असे नातेवाईकांनी सांगितले आहे. कामाचा वाढता ताण, कमी वेतन, सततचा मानसिक दबाव आणि वरिष्ठांकडून होणारा कथित छळ यामुळे ते नैराश्यात गेले होते, असा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.

या सर्व प्रकाराला कंटाळून अतुल लाळगे यांनी आत्महत्या केल्याचा आरोप करत संस्थाचालक बालाजी मुस्कवाड यांच्याविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी नातेवाईकांनी केली आहे. तसेच सुसाईड नोटमध्ये नमूद केलेल्या सर्व बाबींची सखोल चौकशी करून संस्थेच्या कामकाजाची स्वतंत्र चौकशी करण्यात यावी, अशीही मागणी करण्यात येत आहे.
घटनेला तीन दिवस उलटूनही आरोपीला अटक झालेली नसल्याने नातेवाईक आणि नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण असून, पोलिसांनी या प्रकरणात तातडीने कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
To Top