सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
मुंबई : प्रतिनिधी
सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील तांदुळवाडी येथे १४ जून २०२६ रोजी घडलेल्या भीषण अपघातात मृत्युमुखी पडलेल्या आठ जणांच्या वारसांना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी ५ लाख रुपयांची आर्थिक मदत वितरित करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेल्या मदतीनुसार एकूण ४० लाख रुपयांची रक्कम संबंधित कुटुंबीयांना देण्यात आली.
तांदुळवाडी येथे पंढरपूर-सातारा मार्गावर एक पिकअप वाहन विहिरीत कोसळल्याने हा दुर्दैवी अपघात घडला होता. या दुर्घटनेत इंदुबाई दशरथ बावचे (६५), पूजा अमोल सातुरे (२३), पूजाव बालाजी बावचे (२७), अश्विनी संदीप बावचे (२७), संस्कार संदीप बावचे (१४), संस्कृती संदीप बावचे (१४), भारव अमोल सातुरे (८) आणि समर्थ बालाजी बावचे (६ महिने) यांचा मृत्यू झाला होता.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुर्घटनेनंतर मृतांच्या वारसांना आर्थिक मदत जाहीर केली होती. त्यानुसार सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयाने राज्य शासनाकडे प्रस्ताव सादर केला होता.
शासनाची मंजुरी मिळाल्यानंतर मुख्यमंत्री सहायता निधी कक्षामार्फत एकूण ४० लाख रुपयांची मदत सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून संबंधित वारसांच्या खात्यात वितरित करण्यात आली.
या आर्थिक मदतीमुळे दुर्घटनाग्रस्त कुटुंबांना काही प्रमाणात आधार मिळणार असल्याची भावना व्यक्त होत आहे.
