सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
पुणे : प्रतिनिधी
पुणे, खडकवासला धरण प्रकल्पातील पाणीसाठा झपाट्याने कमी होत असल्याने पुणे महापालिकेने शहरात सोमवारपासून एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. महापौर मंजूषा नागपुरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
पाटबंधारे विभागाने एप्रिल महिन्यातच महापालिकेला पाणीकपातीची सूचना केली होती. मात्र, महापालिकेने ३१ मेपर्यंत पाणीपुरवठ्यात कपात न करण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान, भारतीय हवामानशास्त्र विभागाने यंदा सरासरीच्या केवळ ९० टक्के पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. तसेच खडकवासला धरण प्रकल्पात सध्या अवघा पाच टीएमसी पाणीसाठा शिल्लक असल्याने प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून पाणीकपातीचा निर्णय घेतला आहे.
महापौर नागपुरे यांनी सांगितले की, शेतीसाठी आवश्यक आवर्तने, आषाढी वारी तसेच आगामी पावसाळ्यातील अनिश्चितता लक्षात घेऊन उपलब्ध पाण्याचे नियोजन करणे गरजेचे आहे. पाणी बचतीसाठी विविध उपाययोजनांवर बैठकीत चर्चा झाली असून सोमवारपासून एक दिवसाआड पाणीपुरवठा लागू होण्याची शक्यता आहे. यासंदर्भातील अधिकृत परिपत्रक पुढील दोन दिवसांत जारी करण्यात येणार आहे.
महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन झाले असले तरी पाणीकपात लागू होण्यापूर्वीचा एक आठवड्याचा कालावधी महत्त्वाचा ठरणार आहे. हवामान विभागाने पावसाचा अंदाज वर्तविल्यामुळे पुणे शहर आणि धरणांच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्यास जलसाठ्यात वाढ होऊ शकते. अशा परिस्थितीत एक दिवसाआड पाणीपुरवठ्याचा निर्णय स्थगित ठेवला जाऊ शकतो. मात्र, अपेक्षित पाऊस न झाल्यास पाणीकपात अटळ असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
पाणी बचतीसाठी निर्बंध
पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी महापालिकेने काही कठोर निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामध्ये-
गाड्या धुण्यासाठी पिण्याच्या पाण्याचा वापर करण्यास बंदी
वॉशिंग सेंटर बंद ठेवण्याचा निर्णय
जलतरण तलावांवर निर्बंध
बांधकामासाठी पिण्याचे पाणी वापरण्यास मनाई
सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पातील शुद्ध पाण्याचा बांधकाम, उद्याने व अन्य कारणांसाठी वापर अनिवार्य
शहरातील विहिरी व कूपनलिकांची माहिती संकलित करून पर्यायी जलस्रोतांचा वापर वाढविण्याचा प्रयत्न
महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांनी सांगितले की, हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील तीन महिन्यांचे पाणी नियोजन आवश्यक आहे. पाण्याचा अपव्यय रोखण्यासाठी अधिक पाणी वापरणारी ठिकाणे बंद केली जातील. तसेच शहरातील गळती रोखण्यासाठीही विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.
दरम्यान, पाणीकपातीच्या निर्णयामुळे नागरिकांमध्ये नाराजीची शक्यता असली तरी उपलब्ध जलसाठा आणि भविष्यातील गरजा लक्षात घेता हा निर्णय अपरिहार्य असल्याचे महापालिकेचे म्हणणे आहे.
