सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
पुणे, प्रतिनिधी
पुणे, दि. ५ : अन्न व औषध प्रशासनाच्या पुणे विभागाने भेसळयुक्त व संशयित अन्नपदार्थांविरोधात मोठी मोहीम राबवत १ व २ जून २०२६ रोजी विविध ठिकाणी धाडसत्र सुरू केले. या कारवाईत तब्बल ३१ लाख ७३ हजार रुपयांचा अन्नपदार्थांचा साठा जप्त करण्यात आला. तसेच ५ लाख ४५ हजार रुपयांचा प्रतिबंधित अन्नपदार्थांचा साठा जप्त करून १४ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यांना अटकही करण्यात आली आहे, अशी माहिती पुणे विभागाचे सहआयुक्त (अन्न) दि. वा. भोगावडे यांनी दिली.
अन्न सुरक्षा आयुक्तांच्या ‘सुरक्षित अन्न, सुरक्षित औषधे, सुरक्षित महाराष्ट्र’ या मोहिमेअंतर्गत पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये विविध आस्थापनांवर छापे टाकण्यात आले. संबंधित जिल्ह्यांतील अन्न सुरक्षा अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी या मोहिमेत सहभाग घेतला.
साताऱ्यात २१.४० लाखांचा साठा जप्त
सातारा जिल्ह्यातील गोडोली येथे मेसर्स धन्वंतरी डिस्ट्रीब्यूटर्स प्रा. लि. येथे छापा टाकून प्रोटिरिच-डब्ल्यू हर्बल हेल्थ ड्रिंक, चॉकलेट कंपाऊंड आणि सी बकथॉर्न ज्यूस यांचा २१ लाख ४० हजार ९४६ रुपयांचा साठा जप्त करण्यात आला.
पुण्यात तेल, तूप, पनीर आणि चीज ॲनालॉगवर कारवाई
पुणे जिल्ह्यातील मार्केट यार्ड येथील प्राज ट्रेडर्स येथे धाड टाकून ५ लाख ३४ हजार रुपयांचे सोयाबीन व पामोलीन तेल जप्त करण्यात आले. चिंचवड येथील महाराष्ट्र मिल्क डेअरी मधून २७ हजार ६०० रुपयांचे चीज ॲनालॉग, तर वडगाव शेरीतील विठूमाऊली डेअरी मधून भेसळयुक्त तूप व पनीर जप्त करण्यात आले. खराडीतील शिवदत्त डेअरी येथून १.७३ लाख रुपयांहून अधिक किमतीचे पनीर जप्त करण्यात आले.
कोल्हापूरमध्ये तेल आणि सुपारी साठ्यावर धाडी
कोल्हापूर जिल्ह्यातील बनछोडे ब्रदर्स ऑईल मिल येथे ९२ हजार रुपयांचे खाद्यतेल, तर इचलकरंजीतील रामगोपाल भवरलाल सोनी येथून ९७ हजार ६०० रुपयांचे सोयाबीन तेल जप्त करण्यात आले. शिरोळ तालुक्यातील हिदांश इंडस्ट्रीज येथे लेबलदोष व मिथ्याछाप आढळल्याने ॲनालॉग सुपारीचा साठा जप्त करण्यात आला.
प्रतिबंधित अन्नपदार्थांवर १४ ठिकाणी कारवाई
पुणे विभागात १४ आस्थापनांवर कारवाई करून ५ लाख ४५ हजार रुपयांचा प्रतिबंधित अन्नपदार्थांचा साठा जप्त करण्यात आला. बाणेर, हिंजवडी, इंदापूर, सातारा, अकलूज, बार्शी, सांगली आणि विटा येथील पान शॉप्स व इतर आस्थापनांमधून गुटखा व तत्सम प्रतिबंधित पदार्थ जप्त करण्यात आले. इंदापूर येथे कारवाईदरम्यान १.०७ लाख रुपयांचा साठा आणि १.५० लाख रुपयांची वाहतूक करणारी गाडी जप्त करण्यात आली.
नागरिकांना आवाहन-
ग्राहकांच्या आरोग्याशी तडजोड करणाऱ्या तसेच बेकायदेशीर अन्नपदार्थांचे उत्पादन, साठवणूक, वितरण आणि विक्री करणाऱ्यांविरुद्ध अशा मोहिमा पुढेही सुरू राहणार असल्याचे स्पष्ट करत, संशयास्पद प्रकारांची माहिती नागरिकांनी टोल फ्री क्रमांक १८००२२२३६५ वर देण्याचे आवाहन सहआयुक्त दि. वा. भोगावडे यांनी केले आहे.
